ओमप्रकाश देवकर। लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : मैत्रिणीला दवाखान्यात उपचार घेण्याकरिता पैसे नसल्यामुळे वर्गमैत्रिणींनी गावात फिरुन वर्गणी गोळा केली. ही रक्कम मैत्रिणीला देऊन वर्गातील मैत्रिणींनी मदत केली. येथील भीमनगरमध्ये वास्तव्यास असलेले एकनाथ उकंडा बोरकर हे मिस्त्रीचे काम करतात. त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. यातच विवेकानंद विद्या मंदिर येथे इयत्ता दहावीत शिकत असलेली एकनाथ बोरकर यांची मुलगी सोनाली हिला ४ जुलैच्या मध्यरात्री घरात झोपलेली असताना सर्पदंश झाला. त्यामुळे रात्री लक्षात न आल्याने ५ जुलैला सकाळी सोनालीला मेहकर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्पदंश झाल्यामुळे प्राथमिक उपचारादरम्यान बराच पैसा लागला. परिस्थिती हलाखीची असल्याने सोनालीच्या वर्गमैत्रिणी व मित्रांनी सोनालीसाठी मदतीची साद घातली. त्यांची ही धडपड पाहून जनमाणसांचे मन भरुन आले. त्यांनीही सढळ हाताने मदत केली. या चिमुकल्यानी व गावकऱ्यांनी पहिल्याच दिवशी जमविलेली मदत ही १० हजारांपर्यंत पोहचली आहे. सोनालीला आणखी आर्थिक मदतीची गरज आहे. सोनालीच्या मित्र-मैत्रिणीमध्ये प्रेरणा जाधव, निकिता कंकाळ, शीतल इंगळे, प्रज्ञा कंकाळ, उमा गवळी, सीमा गवळी, निकीता सरकटे, तेजस्विनी सरकटे, वैष्णवी वायसे, अश्विनी जाधव, शुभम इंगळे, कुणाल कंकाळ, यश बोरुडे, करण खडसे, छाया डोंगरे, खुशी इंगळे यांचा समावेश आहे. विवेकानंद विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेजच्या सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मदत देऊ केली आहे.
सोनालीच्या उपचारासाठी मैत्रिणींचा पुढाकार
By admin | Published: July 11, 2017 12:07 AM