खामगाव : वयाची १८ वर्षें पूर्ण झाली नसतानाही आई-वडिलांनी मध्य प्रदेशातील मुलाशी जबरदस्तीने बालविवाह लावून दिल्याची तक्रार थेट मुलीनेच दिल्याने, खामगाव शहर पोलिसांनी खामगावातील आई-वडिलांसोबतच उमरिया येथील पती, सासू-सासऱ्यांच्या विराेधात गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने मुलीचे पालकच अडचणीत आले आहेत.
मुलीने महिला नातेवाईकसह शहर पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये तीचा जन्म २००५ मध्ये झाल्याचे नमूद आहे. तरीही त्या अल्पवयीन युवतीचा विवाह २५ जुलै, २०२२ रोजी सोनाळा येथील मामाच्या घरी लावण्यात आला. त्यावेळी तिला कुटुंबीयांनी पाहुणे येत असल्याची माहिती दिली होती. नातेवाइकांकडे मध्य प्रदेशातील उमरिया येथून आलेल्या रोहित कावरे (२५) याच्यासोबत मोबाइलवर मंगलाष्टके वाजवून विवाह लावण्यात आला. त्यावेळी युवतीच्या आई-वडिलांसह रोहितचे आई-वडील नामे संगीता कावरे (४५), देविदास कावरे (५०) हे उपस्थित होते. सुरुवातील पाहुणे येत असल्याचे सांगून ऐन वेळी विवाह लावून देण्यात आला.
त्यानंतर, कावरे कुटुंबाने तिला जबरदस्तीने उमरिया येथे नेले, तसेच कुणाला काही सांगितल्यास जीवानिशी मारून टाकू अशी धमकी दिली. सतत मारहाण करीत असल्याने त्यांची नजर चुकवून तिने घर सोडले, तसेच खामगाव गाठले. तक्रारीवरून पोलिसांनी युवतीच्या आई-वडिलांसह मध्य प्रदेश उमरिया येथील पती रोहित कावरे, संगीता कावरे, देविदास कावरे यांच्यावर भादंविच्या कलमासह बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ९,१०,११ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.