बुलडाणा : मुलींसह त्यांच्या आई-वडिलांच्या अपेक्षा वाढल्याने शेतकऱ्यांच्या उपवर मुलांना मुलगी मिळणे कठीण झाल्याचे चित्र आहे. लग्न जुळविताना नोकरीवाला मुलगा प्राधान्याने शोधला जातो, तर शेतकरी मुलांना मुली देण्यासाठीही वधुपिता तयार नाही. यातून शेतकरी कुटुंबांची अवस्था फार वाईट झाली आहे.
मुलीने बारावीची फेरी गाठली नसली तरी आपल्याला डॉक्टर, इंजिनीअर, हायप्रोफाईल जावई पाहिजे, अशी वधुपिता अपेक्षा व्यक्त करतात. याशिवाय, मुलगा खेड्यात राहणारा नसावा, तो शहरात वास्तव्याला असेल, तरच मुलगी दाखविण्यासाठी मंडळी तयार असतात. अनेकदा तर शेतकरी मुलगा आहे म्हणून पाहणीसाठी गेलेले स्थळ, मुलगी न पाहताच परत येण्याची नामुष्की शेतकरी मुलाच्या पित्यावर ओढवली आहे. समाजामधील शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय वाईट झाला आहे. यातून गावखेड्यामध्ये मुलांच्या लग्नावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. पुणे, मुंबई, मेट्रो शहरांमध्ये मुली देण्यासाठी वधुपिता उत्सुक असतात. गावखेड्यामध्ये सुविधा नसल्याने तसल्या ठिकाणाकडे दुर्लक्ष केले जाते. व्यापारी अथवा इतर कुठला व्यवसाय मुलगा करीत असेल, त्यालाही फारसे प्राधान्य दिले जात नाही. मुलाच्या तुलनेत मुलीकडच्या कुटुंबाचे पारडे लग्न करताना जड झाले आहे. यातून समाजाची पसंती-नापसंतीची तऱ्हा बदलत चालल्याचे दिसून येत आहे.
सरकारी नाेकरीला सर्वाधिक पसंती
सरकारी नाेकरी असेल तरच मुलगी दाखवू असे वधुपित्याकडून सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना मुली शोधताना अडचणी येत आहेत.
सध्याच्या घडीला वधुपित्यांचे भाव सर्वाधिक आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील, गरीब घरातील मुलगी असली तरी वधुपिता जे वाक्य बोलेल, ते वरपित्याला मान्य करावे लागेल, अन्यथा लग्न होणेच कठीण आहे.
शेतकरी कुटुंबामध्ये मुलगी देण्यासाठी वधुपिता तयार नाही. शेतकऱ्यांकडे आणि त्याच्या कुटुंबाकडे छदामही राहत नाही. शेती निसर्गावर आहे. यामुळे वधुपिता शेतकरी कुटुंबाला मुलगी द्यायला तयार नाही.
काेट
प्रत्येक गावात ३० ते ४० मुलांचे लग्न जुळणे कठीण झाले आहे. शेतकरी मुलांकडे विभागणी हाेत हाेत एकर ते दीड एकर राहिलेले आहे. त्यामुळे मुलगी देण्यास तयार हाेत नाहीत. आधीच मुलींची संख्या कमी आहे. खेड्यात सुविधा नसल्याने मुलगी देण्यास तयारच नाही. मुलीचे शिक्षण पाहून स्थळ पाहतात. नाेकरीवर असलेल्या मुलांनाच प्राधान्य देतात. शहरात राहणाऱ्या मुलांनाच मुलगी देतात.
सुनील जवंजाळ पाटील, महाराष्ट मराठा साेयरीक
मुलींसह तिच्या आई-वडिलांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सरकारी नाेकरी करणाऱ्यांना वधुपित्यांकडून प्राधान्य देण्यात येते. खेड्यात राहणाऱ्या मुलांना मुलगी देण्यास वधुपिता तयारच नसल्याचे चित्र आहे. १२वी पास असलेल्या मुलीलाही सरकारी नाेकरीवाला मुलगा पाहिजे. खेड्यात राहणारे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मुलगी देण्यास खेड्यातील लाेकच तयार नाहीत.
विजय क्षीरसागर, संवेदना वधूवर परिचय केंद्र बुलडाणा
मी स्वत: शेतकरी आहे. शेतीमध्ये दरवर्षी रान हिरवे दिसले तरी दुष्काळच असतो. शेतीचा खर्च वाढत आहे. हातात दोन पैसे राहत नाहीत. माझ्या मुलालाच मी शेतामध्ये येऊ देत नाही. सर्वच शेतकरी कुटुंबांची हीच अवस्था आहे. यामुळे वधुपिता चारवेळा विचार करतो.
समाधान जाधव, वधुपिता, काेलवड
शेतीची विभागणी करून मुलाच्या नावावर तीन ते चार एक शेती येणार आहे. त्यामुळे शेतीविषयी माहिती दिल्यानंतर वधुपित्याकडून प्रतिसाद मिळत नाही. सध्या केवळ सरकारी नाेकरीवर असलेले, कंपनीत काम करणारे मुलेच पाहिजे. शेतात काम करणाऱ्याला मुलगी द्यायला सध्या वधुपिता तयारच हाेत नसल्याचे चित्र आहे.
गाैतम इंगळे, वरपिता, बुलडाणा