बुलडाणा, दि. २३- ग्रामीण भागातील कुटुंबीयांच्या नवजात बालकांसाठी अत्यावश्यक सेवा असलेल्या सामान्य रुग्णालयातील शिशू अतिदक्षता विभागासाठी स्वतंत्र जनरेटर व इन्व्हर्टरची व्यवस्था करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली आहे. याबाबत लोकमतने १९ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश शेळके, बुलडाणा तालुकाध्यक्ष डी.एस.लहाने आदींनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जिल्हा सामान्य रुग्णालय हे जिल्ह्यातील रुग्णांच्या औषधोपचाराचे महत्त्वाचे ठिकाण आहे; परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयच हे मोठय़ा समस्यांच्या विळख्यात सापडलेले दिसत आहे. त्यामध्ये शासनाने गरजू रुग्णाकरिता १0८ क्र. अँम्बुलन्स सुविधा उपलब्ध केली असून, बुलडाणा येथून गंभीर अवस्थेतील रुग्णाला दुसरीकडे पाठवायचे असल्यास आपणाकडून फक्त अकोला या ठिकाणीच पाठविण्यात येते; परंतु अकोला या ठिकाणी उपचाराची चांगली व्यवस्था नसल्यामुळे बुलडाणा येथील रुग्ण हे औरंगाबादला जात असतात. या ठिकाणी चांगली वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने व बुलडाण्यापासून जवळदेखील असल्याने सर्व रुग्णांची व त्याच्या नातेवाइकांची औरंगाबादकडे जाण्याची मन:स्थिती असताना आपण त्यांना १0८ अँम्बुलन्स सुविधेद्वारे अकोला येथेच पाठवतो. रुग्णालयात अस्वच्छता पसरली असून, गाजर गवत व इतरही गवत वाढलेले आहे. या सर्व बाबी गंभीर स्वरुपाच्या असून, गरीब रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे, तरी आपण या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करुन हे सर्व प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मोठे आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा नरेश शेळके, डी.एस.लहाने, दत्ता काकस, शंकरराव राजपूत, सत्तार कुरेशी, अनिल बावस्कर, गंजीधर गाडे, संतोष पाटील आदींनी दिला आहे.
शिशू अतिदक्षता विभागासाठी जनरेटर द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2016 2:28 AM