साखरखेर्डा : सिंदखेडराजा मतदारसंघातील दुसरबीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखान्याला पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणेच गतवैभव प्राप्त करू शकतात, असे मत शेतकरी संघटनेचे नेते वामनराव जाधव यांनी कामगारांच्या बैठकीत व्यक्त केले़
बुलडाणा जिल्ह्यात सहकारावर चालणारा जिजामाता सहकारी साखर कारखाना माजी आमदार अण्णासाहेब देशमुख यांनी सुरू केला. त्यावेळी या मतदारसंघात सिंचनाची व्यवस्था नव्हती. केवळ खडकपूर्णा नदीपात्रातील वाहणाऱ्या पाण्यावर अवलंबून राहून या भागातील शेतकऱ्यांनी शेती केली. कारखान्याला पुरेल तेवढा ऊस पुरविला. कारखाना पूर्ण क्षमतेने चालला. यामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. निसर्गरम्य परिसरात कारखाना अनेक वर्षे चालला. अण्णासाहेब देशमुख यांच्यानंतर कारखान्याला अवकळा आली. अनेक वेळा प्रशासक, प्रशासक मंडळे स्थापन करण्यात आली. परंतु, कारखान्याला गतवैभव प्राप्त झाले नाही. खाजगी व्यक्तींना कारखाना चालविण्यासाठी दिला. परंतु, नियम व अटींची पूर्तता न केल्याने कारखाना बंद पडला. ना. शिंगणे यांनी अनेक वर्षे कारखाना चालविला. मधल्या काळात प्रचंड दुष्काळ, पाण्याचा ठणठणाट जाणवल्याने पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. आजची बदलती परिस्थिती पाहता संत चोखामेळा खडकपूर्णा जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. मराठवाडा आणि विदर्भातील सीमेवर विदृपा जलाशयही आहे. त्यामुळे कारखाना क्षेत्रातील २५ किलोमीटर परिसरातील शेती ऊस उत्पादनाला उपयुक्त आहे. ऊस वाहतुकीसाठी रस्ते आहेत. मुबलक प्रमाणात सोयी मागील २५ वर्षांत झाल्या आहेत़ त्यामुळे हा साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जाधव यांनी केले़