लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : मातृतीर्थ सिंदखेडराजा ते जालना रोडवर शेकडो एकर परिसरात जिजाऊ सृष्टी उभारण्याचा प्रकल्प वेगाने पूर्णत्वास जात आहे. या जिजाऊ सृष्टीवर दरवर्षी १२ जानेवारी रोजी राज्यातूनच नव्हे, तर देशभरातून लाखो जिजाऊभक्त मासाहेबांना वंदन करण्यासाठी येतात. त्यामुळे या जिजाऊ सृष्टीचा विकास वेगाने होण्यासाठी जिजाऊ सृष्टीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी जि.प. सदस्य डॉ. ज्योती खेडेकर यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे केली आहे.मातृतीर्थ सिंदखेडराजा हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ आहे. राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मासाहेबांचे जन्मस्थळ आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. याच ठिकाणी गेल्या २५ वर्षांपासून मराठा सेवा संघाच्या पुढाकारातून भव्य जिजाऊ सृष्टी प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. या ठिकाणी दरवर्षी मोठय़ा प्रमाणात जिजाऊ भक्तांची निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था व्हावी, यासाठी जिजाऊ सृष्टीचे संयोजक प्रयत्नरत आहेत. या ठिकाणी वाचनालय, जिजाऊ चरित्र चित्र प्रदर्शन, भव्य सभागृह तसेच देश-विदेशातून येणार्या जिजाऊ भक्तांसाठी निवासाची व्यवस्था अशी अनेक विकास कामे होणे अपेक्षित आहे. आजवर जिजाऊ सृष्टीचा विकास समाजातील दानशूर आणि शिवदानातून मिळणार्या रकमेतून करण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघाने केला आहे. भविष्यात या ठिकाणी येणार्या जिजाऊ भक्तांच्या सुविधेसाठी अनेक विकास कामांसाठी निधीची आवश्यकता आहे. यापूर्वी अनेक नेत्यांनी या जिजाऊ सृष्टीवरील विचारपीठावरून सृष्टीच्या विकासासाठी निधी देण्याचे मान्यही केले आहे; मात्र आजवर प्रत्यक्षात तशी कारवाई झालेली दिसत नाही. या पृष्ठभूमीवर ८ जानेवारी रोजी बुलडाणा येथे पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्य बैठकीत जि.प. सदस्य डॉ.ज्योती खेडेकर यांनी शासनाने दीक्षाभूमी नागपूर, पोहरा देवी संस्थान, भगवान गड आदी स्थळांच्या धर्तीवर जिजाऊ सृष्टीसदेखील ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन जिजाऊ सृष्टीच्या विकासासाठी मोठय़ा प्रमाणावर निधीसुद्धा देण्यात यावा, अशी मागणी ना. फुंडकर यांच्याकडे केली आहे.
विद्यापीठ अधिसभेवर ज्योती खेडेकर यांची नियुक्तीसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेवर जि.प. सदस्य डॉ. ज्योती शिवशंकर खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुलडाणा जि.प. शिक्षण समिती गटातून त्यांची नियुक्ती झाली असून, याबाबतचे पत्र विद्यापीठाचे कुलसचिव यांना जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ९ जानेवारी रोजी दिले आहे.