बुलडाणा : वैद्यकीय प्रवेश परीक्षेत पात्र ठरल्यानंतरही गुणवत्ता डावलून खासगी वैद्यकीय महाविद्यालयाने प्रवेश नाकारल्यामुळे येथील स्नेहल देशपांडे व नकुल सोनुने या विद्यार्थ्यांना नुकसानभरपाईपोटी २0 लाख रुपये राज्य सरकारने द्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. येथील पॅथॉलॉजिस्ट मिलिंद देशपांडे यांची कन्या स्नेहल देशपांडे व नकुल सोनुने यांनी सन २0१२ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेशपूर्व परीक्षा दिली होती. या परीक्षेमध्ये ते पात्र ठरल्यामुळे नियमानुसार त्यांना एमबीबीएससाठी प्रवेश देणे अनिवार्य होते; मात्र या विद्यार्थ्यांची गुणवत्ता डावलून खासगी वैद्यकीय महाविद्यालयाने त्यांच्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी प्रवेश नियंत्रण समितीकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत समितीने पुणे, औरंगाबाद आणि नागरपूर येथी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता यांच्यामार्फत चौकशी केली असता खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी २६0 वैद्यकीय प्रवेशामध्ये अफरातफर केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर समितीने हे बेकायदेशीर २६0 प्रवेश रद्द करावेत अशी शिफारस राज्य सरकारकडे केली होती. तथापि, राज्य सरकारने या समितीच्या शिफारशीची दखलही घेतली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तब्बल दोन वर्ष हे प्रकरण न्यायालयात चालले. आता २ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. चल्लमेश्वर व न्या. ए.के. सिकरी यांच्या खंडपीठाने निकाल दिला. या निकालात म्हटले आहे की, प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाने नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी २0 लाख रुपये द्यावे, तर संबंधित दोषी अधिकार्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी.
विद्यार्थ्यांना २0 लाख रुपये भरपाई द्या
By admin | Published: September 07, 2014 12:33 AM