शिक्षण क्षेत्रामध्येही कोरोनाने होत्याचे नव्हते केले आहे. अगदी केजी वन पासून ते पीजीपर्यंतचे सर्वच शिक्षण ऑनलाइन झाले आहे. बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. त्यानंतर दहावीच्या परीक्षांना सुरूवात झाली. परीक्षेच्या काळातच कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे परीक्षांच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला. दहावीचा एका विषयाचा पेपरही रद्द करण्याची वेळ या वर्षात आली. ऐन परीक्षेच्या तोंडावर शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्ग बंद करावे लागले. शिक्षण विभागात पहिल्यांदाच मोठा बदल पाहावयास मिळाला. त्यानंतर सर्व शिक्षण ऑनलाइनवर सुरू झाले.
खासगी शाळा, महाविद्यालयातील शिक्षक तसेच व्यवस्थापनासमोर मोठी अडचण निर्माण झाली. अनेक विद्यार्थ्यांचे मागील वर्षीचे शुल्क प्रलंबित राहिले व नव्या वर्षांचे शुल्क भरता आले नाही. शासनातर्फे देखील आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेत मिळाली नाही. खासगी शाळांनी शुल्क वसुलीसाठी तगादा लावल्याने पालकांची चिंता वाढली. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी शुल्क वसुलीमध्ये सवलत देण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी बऱ्याच संस्थांमधून झाली नाही. नीट परीक्षा घेण्याबाबतही बराचसा गोंधळ शिक्षण विभागात पाहावयास मिळाला.
पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वार्षिक मूल्यमापनाच्या आधारे पुढल्या वर्गात प्रवेश दिला. दहावी ते बारावीच्या उत्तर पत्रिका तपासून शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडली. विशेषत: वार्षिक मूल्यांकन आणि ऑनलाईन परीक्षेतील गुणांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरही भरघोस गुण दिसून आले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कामकाज कोरोना संसर्गामुळे १३ मार्च २०२० पासून बंद झाले. कोरोनाचे संकट आले आणि विद्यापीठाचा कारभार बंद झाला. त्यामुळे परीक्षा कधी, कशा घ्याव्यात, हा प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित झाला होता. अंतिम वर्षाची परीक्षा आणि निकाल या गोंधळातच विद्यार्थ्यांचे वर्ष सरले. प्राथमिक व खासगी शाळांमध्येही परीक्षांच्या बाबतीत गोंधळच उडाला. २०२० हे वर्ष शिक्षण क्षेत्रासाठी एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणेच राहिले. सरत्या वर्षांत कोरोनाने केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक, प्राध्यापक, शाळा-महाविद्यालय व्यवस्थापन व पालकांची देखील परीक्षाच पाहिली. कुणाला वेतन नाही, तर कुणाकडे स्मार्टफोन नव्हता. मात्र शिक्षणक्षेत्राने यातूनही बऱ्याच सकारात्मक बाबी शोधून काढल्या, त्यामुळे २०२० या वर्षात बरेच काही गमावले असले तरी नवीन खूप काही शिकविले आहे.
दृष्टिक्षेपात शिक्षण विभागातील घडामोडी
अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात अपयश आल्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षा घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविली.
ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने विनाअनुदानित खासगी शाळांवरील अनेक शिक्षकांचा रोजगार हिरावला. त्यामुळे शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मोबाईलच झाले वर्गखोली.
शाळा सोडून शिक्षकांच्या ड्यूट्या चेकपोस्टवर लागल्या.
बोर्डाच्या निकालावर परिणाम झाला.