ग्रामीण भागातील खेळाडू आता कुठल्याच खेळांत मागे नाहीत. आपल्यातील टॅलेंटचा पुरेपूर वापर करीत हे खेळाडू मैदान गाजवित आहेत. नुकतीच डेहरादून येथे राष्ट्रीय ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील मोहिनी अरविंद अंभोरे हिने ‘गोल्ड मेडल’ जिंकून जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा येथील द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये मोहिनी सराव करते. गतवर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. आतापर्यंत विविध स्पर्धेत सहभागी होत, तिने अनेक पारितोषिके पटकावले आहेत. तिचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी असून, खेळासाठी तिला सतत प्रोत्साहन देतात. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचे तिचे ध्येय आहे. ध्येयाचा पल्ला गाठण्यासाठी कसून सराव सुरू आहे. सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रांत प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात मोहिनी सराव करीत आहे. तिच्या यशाबद्दल राजर्षी शाहू पतसंस्थेच्या मुख्यालयी तिचा सत्कार केला. यावेळी तिचे आईवडील यांच्यासह शरद सपकाळ, निखिल शिंबरे उपस्थित होते.
रोनाल्डो आहे ‘रोल मॉडेल’
साधारणपणे आपल्या खेळाशी संबंधित व्यक्तींचा आदर्श खेळाडू मानतात. मात्र, धनुर्विद्या खेळणारी मोहिनी हिचा ‘रोल मॉडेल’ प्रसिद्ध फुलबॉलपटू रोनाल्डो आहे. रोनाल्डोकडून खूप शिकायला मिळते. त्याचे टायमिंग अफलातून आहे. हा महान खेळाडू आपला आदर्श असल्याचे तिने सांगितले.