खामगाव : घराचा कडी तोडून आत शिरलेल्या दोन चोरट्यांनी चाकूच्या धाकावर ७० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. ही घटना शनिवारी (12 ऑक्टोबर) रात्री उशिरा 2 वाजताच्या सुमारास शहरातील तिरूपती नगरात घडली. यावेळी चोरट्यांनी घरातील एकाच्या छातीवर हातोड्याने प्रहारही केला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, याप्रकरणी शहर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल आहे.
आदर्श नगर रोडवरील तिरूपती नगर भागात सुभाष दिनकरराव तोमर आपल्या परिवारासह राहतात. शुक्रवारी रात्री दहा वाजता दरम्यान, घरातील हॉलमध्ये एका बाजीवर ते झोपी गेले. त्यांच्या पत्नी आणि लहान मुलगा हॉलमध्येच बाजूलाच झोपल्या होत्या. तर मोठा मुलगा सोप्यावर झोपला असताना रात्री दोन चोरट्यांनी घराची कडी तोडून आत प्रवेश केला. आवाज ऐकताच बाजीवर उठून बसलेल्या तोमर यांच्या छातीवर दोन पैकी एका चोरट्याने जबर प्रहार केला. तर दुस-याने चाकूचा धाक दाखवून तोमर यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवित अंगावरील दागिणे लुटले. रात्रीच्या अंधारात सुमारे २० मिनिटे हा थरार चालला.
यामध्ये सुभाष तोमर हे गंभीर जखमी झाले असून, घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. याप्रकरणी सुभाष तोमर यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरोधात कलम ४५९, ३८०, ३४ भादंविनुसार शनिवारी सकाळी ७ वाजता गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस निरिक्षक संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक रविंद्र लांडे करीत आहेत.
७० हजाराचा ऐवज लंपास!
तिरूपती नगरातील सिनेस्टाईल धाडसी चोरी प्रकरणात दोन चोरट्यांनी सुभाष तोमर यांच्या पत्नी शीतल तोमर यांच्या अंगावरील सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची कर्णफुले तर बेडरूमधील एका कोठीत ठेवलेला सोन्याचा हार, कानातले खडे, सोने-चांदीच्या दागिन्यांसह चांदीची लक्ष्मीची मूर्ती असा एकुण सुमारे ७० हजाररूपयांपेक्षा जास्त रक्कमेचा ऐवज लुटून नेला.
आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना!
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे उपनिरिक्षक रविंद्र लांडे, उपनिरिक्षक संजय सदांशिव, सुधाकर थोरात, देवानंद शेळके, रविंद्र कन्नर, दीपक राठोड, जितेश हिवाळे आणि पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी एका संशयीत आरोपीच्या शोधार्थ पोलिस पथक अकोला येथे रवाना करण्यात आले. तर काही आरोपींची छायाचित्राद्वारे ओळखपरेड केली जात आहे.
डीवायएसपी, पोलिस निरिक्षकांची तत्परता!
शहरातील तिरूपती नगरात चोरी झाल्याची माहिती मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील आणि शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले शहर पोलिस स्टेशनमध्ये रात्री २:४५ वाजता दाखल झाले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठून स्थळ निरिक्षण केले. संशयीत आरोपीच्या शोधार्थ अकोला तसेच खामगाव शहरातील विविध भागात पोलिस पथक रवाना केले.