गोंदिया - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (दि.१९) पहिल्या टप्यात मतदान झाले. मतदारसंघातील एकूण २१३३ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. उन्हाची तिव्रता लक्षात घेता मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रावर पोहचत आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. सकाळी ७ ते ९ या कालावधीत मतदारसंघात ७.२२ टक्के मतदान झाले होते.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. तर प्रशासनाने गेले महिनाभर मतदानासाठी राबविलेल्या जनजागृती उपक्रमाचा प्रभाव सुध्दा मतदान केंद्रावरील मतदारांच्या गर्दीवरुन दिसून आला. आमगाव विधानसभा मतदारसंघातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या पालांदूर आणि शिलापूर येथील मतदान केंद्रावर सुध्दा मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी केल्याचे चित्र होते. सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी, पांढरी येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या सकाळी ८ वाजतापासूनच रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्रावर दिव्यांग व वयोवृध्द नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी व्हिलचेहर तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती.
तर लोकप्रतिनिधीनी सुध्दा सकाळीच मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहचत मतदानाचा हक्क बजावून मतदारांचा उत्साह वाढविला. आ. सहषराम कोरोटे यांनी पत्नीसह देवरी येथील जि.प.शाळेतील मतदान केंद्रावर पोहचत मतदानाचा हक्क बजाविला. तर माजी आ. राजेंद्र जैन यांनी पत्नी मुलासह गोंदिया येथील एनएमडी महाविद्यालयातील मतदान केंद्रावर पोहचत मतदानाचा हक्क बजाविला.