बुलडाणा : बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाच्या खिशातील पाकिट काढताना रंगेहात पकडलेल्या आरोपीस मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी ३० जुलै रोजी तीन वर्ष चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र देण्याची शिक्षा ठोठावली. दिनेश कोलते हे ६ जून २०१७ रोजी संध्याकाळी सातेसात वाजेच्या सुमारास बुलडाणा बसस्थानकावरुन औरंगाबाद जाणाºया बसमध्ये चढत होते. गर्दीचा फायदा घेवून मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील शेख साहिल शेख तसलीम (वय १९) याने त्यांच्या खिशातील पाकिट काढले. मात्र कोलते यांना ही बाब कळताच त्यांनी चोरट्याचा हात पकडला. त्यामुळे चोरट्याने पाकिट त्याच्या साथीदाराकडे दिले व तो पाकिट घेऊन पळून गेला. पाकिट काढताना आरोपीला रंगेहात पकडल्यामुळे त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्याविरुद्ध कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला व मुख्य न्यायदंडाधिकाºयांच्या कोर्टात खटल्याचे कामकाज चालले. आरोपी शेख साहिल शेख तसलीमविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास तीन वर्ष चांगल्या वर्तणूकीचे हमीपत्र देण्याची शिक्षा ठोठावली. तसेच सदर कालावधीत पुन्हा पाकिटमारीचा अपराध केल्यास या गुन्ह्यातील तीन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यास तो पात्र ठरेल, अशी सक्त ताकीद दिली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अनिलकूमार वर्मा यांनी कामकाज पाहिले. ठाणेदार यु. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कांबळे व मांटे यांनी मदत केली.