बुलढाणा : शहरातील चिखली मार्गावर देवीच्या मंदिरानजीक ६ जुलै रोजी दुपारी विचित्र अपघात झाला. यात रिक्षा चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने त्यामागील कार चालकानेही ब्रेक दाबले. यावेळी या कारच्या मागे लोखंडी अँगल घेऊन जाणारे मालवाहू वाहन होते. भरधाव वेगाने जात असलेल्या या वाहन चालकानेही त्वरित ब्रेक दाबल्याने हे लोखंडी अँगल थेट समोरील कारच्या मागची काच फोडून आत घुसून दुर्घटना झाली. सुदैवाने या कारच्या मागील सीटवर कोणीच बसलेले नव्हते.
त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या विचित्र अपघातामुळे चिखली मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी वाहतूक सुरळीत केली. बुलडाणा कृषी विभागात कार्यरत गजानन सांगळे यांच्या कारचे यात मोठे नुकसान झाले असून मालवाहू वाहन हे बुलढाणा येथील एका हार्डवेअर मालकाचे असल्याची माहिती आहे.
अवजड वस्तूंची असुरक्षित वाहतूकहा अपघात म्हणजे अवजड वस्तूंची असुरक्षितपणे होणाऱ्या वाहतुकीचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिस प्रशासन, आरटीओची यंत्रणा कोणते पाऊल उचलते व प्रकरणात काय कारवाई होते याकडे लक्ष लागून राहिले आहे. कारच्या मागील सीटवर कोणी असते तर मोठा अनर्थ घडला असता.