खामगाव: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत खामगाव शहराची राज्यस्तरीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर आता केंद्रीय तपासणी पथकाकडून शहराची तपासणी केली जाणार आहे. त्याअनुषंगाने उघड्यावरील हगणदरी रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी म्हणून, पालिकेने नवीन पथकांचे गठन केले आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हगणदरीमुक्त शहर म्हणून खामगाव शहराने जिल्हा स्तरावर सोबतच राज्यस्तरावर आपला सहभाग नोंदविला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा आणि राज्य पातळीवरून खामगाव शहराची तपासणीही करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा आणि राज्यस्तरीय तपासणी पथकाचे सुचविलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यासाठी, तसेच संपूर्ण शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी आता नव्याने स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या देखरेख पथकाची पुन्हा फेररचना करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी १२ जून रोजी नव्याने गुड मॉर्निंग पथकाची रचना करण्यात आली होती. दरम्यान, आता सप्टेंबरच्या सुरुवातीला पुन्हा फेररचना करण्यात आलेल्या पथकांकडे संपूर्ण परिसराची सरसकट जबाबदारी न देता, विशिष्ट परिसराची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये पथक प्रमुखांसह चार सहायकांची नियुक्ती करण्यात आली असून, या पथकामध्ये पालिकेतील ६५ कर्मचार्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता गुडमॉर्निंग पथकाकडून प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याचे संकेत आहेत.
सकाळ-संध्याकाळ देणार भेटी!खामगाव नगरपालिका प्रशासनाच्यावतीने शुक्रवारी फेररचना करण्यात आलेल्या पथकामध्ये ५६ जणांचा समावेश आहे. यामध्ये आरोग्य विभागासोबतच इतरही विभागातील अधिकारी कर्मचार्यांचा समावेश आहे. एका पथकामध्ये चौघांचा समावेश राहणार असून, चौघा जणांचे पथक सकाळी तर दुसर्या चौघा जणांचे पथक सायंकाळी शहराच्या विविध भागात भेटी देणार आहेत.