लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील उघड्यावरील हगणदरी रोखण्यासाठी पालिका प्रशासन पुन्हा नव्या जोमाने सज्ज झाले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीसाठी नगर पालिका प्रशासनाने गुड मॉर्निंग कार्यान्वित केले आहे. काटेकोर अंमलबजावणीसाठी ५ पथक गठीत करण्यात आली असून, सकाळ-संध्याकाळ हे पथक गस्त घालणार आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत शौचालयांचे उद्दीष्टपूर्ण करण्यासाठी तसेच शहर १०० टक्के हगणदरीमुक्त घोषीत करण्यासाठी नगर पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. दरम्यान, स्वच्छ भारत अभियानातंर्गत पुन्हा नव्याने शहराची चाचपणी केली जाणार असल्याने आता नव्याने गुड मॉर्निंग पथक सज्ज करण्यात आले आहे. शहरातील उघड्यावरील हगणदरीची पाच ठिकाणे निश्चित करून सरासरी १० सदस्यीय पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये बाळापूर रोड, बुरड कॉलनी, ओंकारेश्वर स्मशान भूमी, धोबी खदान, रावण टेकडी या परिसराचा समावेश असून अनुक्रमे एस.के. देशमुख, सतीश पुदागे, एस.एम.नेहारे, एस.पी. कुळकर्णी, एल. जी. राठोड यांच्याकडे पथक क्रमांक १ ते ५ चे पथक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळ-संध्याकाळी गस्त!
शहरातील उघड्यावरील हगणदरी रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून पाच पथके गठीत करण्यात आली आहे. या पथकांमध्ये महिला कर्मचाºयांचाही समावेश असून सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळेत ही पथके गस्त घालणार आहेत.