चिखली पालिकेत विषय समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पाठबळाने सभापतिपद मिळविणारे गोपाल देव्हडे यांनी भाजपच्या कोअर कमिटीत सभापतिपदासाठी आपले नाव निश्चित करण्यात आले होते, असा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर भाजप कोअर कमिटीचे महत्त्वाचे सदस्य ज्येष्ठ नेते सतीश गुप्ता यांनी एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे देव्हडेंचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले. चिखली नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक १८ जानेवारी रोजी झाली होती. त्या बैठकीत पालिकेच्या विषय समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आमदार श्वेता महाले, सतीश गुप्त, अॅड. विजय कोठारी, डॉ.प्रतापसिंह राजपूत, रामकृष्ण शेटे, रामदास देव्हडे, पंडितराव देशमुख यांच्यात सभापती निवडीबाबत चर्चा झाली. यामध्ये नगरपालिकेतील भाजपचे विमल देव्हडे, ममता बाहेती, हंसाबाई आतार व विजय नकवाल या नगरसेवकांना सभापती बनविण्याचे ठरले होते, असे असताना गोपाल देव्हडे यांनी कोअर कमिटीने त्यांचे नाव सभापतिपदासाठी निश्चित केले होते, हा दावा केला होता. तो दावा साफ खोटा आहे, तसेच त्यांनी विविध चित्रवाहिन्यांना आणि सामाजिक माध्यमांना जाहीर स्टेटमेंट दिले त्यात त्यांनी त्यांचे नाव निश्चित केल्याचे म्हटले होते; वस्तुत: त्यांनी दिलेले वक्तव्य खोटे आणि दिशाभूल करणारे आहे, असे सतीश गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.
कोअर कमिटीत गोपाल देव्हडेंच्या नावाची चर्चाच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:35 AM