बुलडाणा, दि. २७- गत तीन दिवसांत जिल्ह्यात कोसळलेल्या जोरदार पावसामुळे मूग व उडिदाच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट आली आहे. परिणामी, बाजारात उडिदाची मागणी वाढली असून, भाव आठ हजारांपेक्षा जास्त मिळत आहेत. यावर्षी सुरुवातीपासूनच मुबलक पाऊस असल्यामुळे जिल्ह्यात मुगाची २५ हजार ६१७ हेक्टरवर तर उडिदाची २६ हजार ८१६ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. मुबलक पावसामुळे मूग व उडिदाचे पीक जोमात होते. गत आठ दिवसांपासून शेतकरी सदर पिकाची काढणी करीत आहे. मूग व उडिदाची काढणी करून अनेक शेतकर्यांनी शेतात ढीग लावले आहेत. शेतकरी यावर्षी चांगले उत्पादन होईल, या अपेक्षेत असतानाच २५ ते २६ सप्टेंबरच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकर्यांनी शेतात ढीग लावून ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाले, तसेच शेतात सध्या काढणीला आलेल्या झाडांच्या शेंगाही जोरदार पावसाने गळून पडल्या, त्यामुळे शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. मूग व उडिदाच्या पिकाचे नुकसान झाल्याचा परिणाम बाजारावर पडला आहे. या पिकांची बाजार समितीत आवक घटली आहे, तसेच भावातही वाढ झाली आहे. मुगाला शासनाने ५२00 रुपये हमीभाव दिला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुगाला चार हजार रुपये प्रती क्विंटल भाव होते. यादरम्यान व्यापार्यांनी या दरात मुगाची खरेदी करून शेतकर्याची प्रचंड लूट केली. त्यानंतर शासनाने हमीभाव केंद्र सुरू करून हमीभावात मुगाची खरेदी करणे सुरू केले. गत आठ दिवसांपासून मुगाच्या भावातही वाढ झाली आहे. उडिदाच्या भावातही अचानक वाढ झाली असून, सध्या बाजारात उडिदाला सात हजार रुपये, आठ हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. या पिकांच्या भावात वाढ झाली असली, तरी त्याचा फायदा होणार्या शेतकर्यांची संख्या अत्यल्प आहे. भाववाढीचा फायदा शेतकर्यांऐवजी व्यापार्यांनाच मूग व उडिदाच्या पिकात गत एक महिन्यात दीड ते दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. शेतकर्यांना पैशाची गरज असल्यामुळे पीक येताच शेतकरी विक्री करतात. व्यापारी या मालाची खरेदी करून साठवणूक करतात. भाववाढ झाल्यानंतर शेतमालाची विक्री करतात. त्यामुळे सध्या मूग व उडिदाच्या होत असलेल्या भाववाढीचा फायदा शे तकर्यांना कमी तर व्यापार्यांनाच जास्त होत आहे. जोरदार पावसामुळे सोयाबीनचेही नुकसान जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे काही भागात सोयाबीन पिकाचे जोरदार नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेंगा झडल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गत तीन दिवसांपासून मूग व उडिदाच्या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आवक घटली असून, याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. या पिकांचे भाव वाढले असले, तरी त्याचा फायदा शेतकर्यांऐवजी व्यापार्यांनाच अधिक होणार आहे.- गजानन अमदाबादकर शेतकरी संघटना, बुलडाणा.
मूग, उडिदाची आवक घटली!
By admin | Published: September 28, 2016 1:19 AM