लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: जिल्ह्यातील मोताळा येथील शेतकऱ्यांचा मुख्य जोडधंदा हा दुधाचा असून, या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी दुग्धव्यवसाय करतात़ तरी या तालुक्यात शासनाने अद्ययावत दूध संकलन केंद्र शीतगृहासह निर्माण करण्याबाबतची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी आमदार राहुल बोंद्रे व आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात कपात सूचनेद्वारे केली होती़ त्यावर उत्तर देताना या तालुक्यात कार्यरत दुग्ध उत्पादक संस्थांनी शासनाकडे दूधपुरवठा करण्याची तयारी दर्शविल्यास मोताळा केंद्रावरील डीजीसेठ रूममध्ये २ हजार लीटर क्षमतेचा ब्लक कूलर बसवून दूध संकलन करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल, असा खुलासा दुग्ध विकास मंत्री ना. महादेव जानकर यांनी केले आहे़ मोताळा येथे ११ फेबु्रवारी १९९७ रोजी शासकीय शीतकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले होते़ सन १९९७ ते जून २०१० पर्यंत या शीतकरण केंद्राला नियमित दूध पुरवठा संकलन करणाऱ्या सहकारी संस्थाकडून केला जात होता; परंतु शासनाच्या दरापेक्षा ५ ते ६ रुपये प्रती लीटर जास्त खरेदी दर खासगी प्रकल्पधारकांकडून दूध उत्पादकांना मिळत असल्याने दूध उत्पादक संस्थांनी शासनाला दूध पुरवठा करणे बंद केल्याने दूध संकलनामध्ये घट होऊन मोताळा केंद्रावरील दूध संकलन बंद करण्यात आले आहे. तर या केंद्राची इमारतही धोकादायक तथा वापरण्यात आयोग्य असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी कळविले आहे़ शिवाय केंद्रावरील यंत्र सामग्रीसुद्धा कालबाह्य झालेली असल्याने शासनाने निर्लेखित केलेली आहे़ दरम्यान, आमदार राहुल बोंद्रे व आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलेल्या मागणीच्या अनुषंगाने मोताळा तालुक्यातील संस्थांनी शासनास दूधपुरवठा करण्याची तयारी दर्शविल्यास तात्पुरत्या स्वरूपात मोताळा केंद्रावरील डीजीसेठच्या रूममध्ये २ हजार लीटर क्षमतेच्या बल्क कूलर बसवून दूध संकलन करण्याबाबतची कार्यवाही करण्याची तयारी दुग्ध विकास मंत्रालयाने दर्शविली आहे़ दुग्ध विकास मंत्री ना. महादेव जानकर यांनी उपस्थित करण्यात आलेल्या कपात सूचनेच्या अनुशंगाने दिलेल्या लेखी उत्तरात तसे स्पष्ट केले आहे़
मोताळा दूध संकलन केंद्र सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक
By admin | Published: June 30, 2017 12:31 AM