बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकर्यांवर सातत्याने नैसर्गिक आपत्तीमुळे, हवामान बदलामुळे संकटे येत आहेत. नापिकी व दुष्काळाच्या काळात संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असणार आहे. हवामान बदलामुळे उद्भवणार्या शेतीसमोरील संकटांच्या काळात शेतकर्यांनी धीर सोडू नये. धैर्याने परिस्थितीचा सामना करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकाचा ६६ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, आमदार हर्षवर्धन सपकाळ, जि.प अध्यक्ष अलका खंडारे, माजी आमदार विजयराज शिंदे, जि.प उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, सभापती आशा झोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, जिल्हा पोलीस अधीक्षक संजीवकुमार बावीस्कर, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदींची उपस्थिती होती. दुष्काळाच्या संकटातून शेतकर्यांना सावरण्यासाठी आर्थिक मदतीचे वाटप सुरू असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले की, शासनाने १८३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता जिल्ह्याला दिला आहे. यानंतरही शासन १४५ कोटी रूपयांचा दुसरा हप्ता देणार आहे. या मदतीचे वाटप थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात करण्यात येत आहे, तर पीक विमा योजनेच्या माध्यमातून ९१ कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. ते पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेत निवडलेल्या ३३0 गावांमध्ये ५ हजार ७९४ कामे जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली आहे; तसेच २४६ कामे प्रगतीपथावर आहेत. १६६0 लाभार्थ्यांना सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
शासन शेतक-यांच्या पाठीशी - जिल्हाधिकारी
By admin | Published: January 28, 2016 12:16 AM