अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरे आणि खेडे हगणदरीमुक्त करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात मोठय़ा प्रमाणात शौचालयांची निर्मिती करण्यात येत आहे; मात्र या अभियानाला हरताळ फासत चक्क पाया आणि शोषखड्डे नसलेली एक-दोन नव्हे तर अनेक शौचालये उभी राहत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. या प्रकाराला वेळीच आळा न घातल्यास स्वच्छ महाराष्ट्र अभियान एक ‘उरकण्या’चा विधी तर ठरणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सर्वच शहरांसोबतच ग्रामीण भागातही स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. यामध्ये उघड्यावर शौचास जात असलेल्या कुटुंबांना शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागात १२ हजार रुपये तर शहर भागात १७ हजार रुपये प्रति युनिटप्रमाणे अनुदान दिल्या जात आहे. त्याचप्रमाणे प्रोत्साहन अनुदानाच्या माध्यमातूनही राज्य आणि केंद्र शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत; मात्र ‘नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी’ घोषवाक्य असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या शौचालयाचा दर्जा ग्रामीण भागात अतिशय खालावला असल्याचे दिसते. राज्यातील २७ हजार ग्रामपंचायतींपैकी ७-८ हजार ग्रामपंचायती हगणदरीमुक्तीपासून वंचित असल्याचा शासनाचा दावा असला तरी, शासनाचे स्वच्छ महाराष्ट्र अभियान कागदोपत्रीच यशस्वी तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे. भिंगारा ग्रामपंचायत अंतर्गत चाळीसटापरी गटग्रामपंचायतीत निर्माण करण्यात आलेली अनेक शौचालये केवळ औपचारिकता ठरणार असल्याचे दिसून येते. निकृष्ट दर्जाचे शौचालय किती काळ तग धरणार, हे येणार काळच ठरवेल, एवढे मात्र निश्चित!
केवळ एकाच शौचालयाला अर्धवट शोष खड्डा!जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत भिंगारा-चाळीस टापरी ग्रामपंचायतमध्ये २१ शौचालयांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. यापैकी काही शौचालयांचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे; मात्र २१ पैकी केवळ एकाच शौचालयाला शोषखड्डा तयार करण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे हा शोषखड्डादेखील अर्धवट अवस्थेत आहे.
पाया नसलेल्या शौचालयाची निर्मिती!भिंगारा ग्रामपंचायत अंतर्गत चाळीसटापरी गटग्रामपंचायतमध्ये ८६ घरे असून या गट ग्रामपंचायतीची लोकसंख्या ४४६ इतकी आहे. दरम्यान, गावात बांधण्यात आलेल्या २१ पैकी अनेक शौचालयांना पायाही बांधण्यात आला नाही. चक्क जमिनीवर शौचालय बांधकाम केल्याने हे शौचालय किती काळ टिकणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
साडेतीन हजारात शौचालयांची निर्मिती!चाळीसटापरी येथे सिमेंटच्या ३५ विटांच्या वापरून सिमेंटच्या सहाय्याने बांधकाम करण्यात येत आहे. यासाठी पायाचाही वापर करण्यात येत नसल्याने मजुरीसह अवघ्या ३,५00 रुपयांमध्ये एका शौचालयाची निर्मिती करण्यात येत असल्याचा आरोप या भागातील आदिवासींनी केला आहे. शौचालय बांधकामासाठी धनादेशावर अंगठा घेऊन पाचशे रुपये लाभार्थींच्या हातावर देत, अनुदान बळकवण्याच्याही तक्रारी काही आदिवासींच्या समोर येत आहेत. दरम्यान, यासंदर्भात अधिक माहितीसाठी ग्रामसेवक कैलास चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
निकृष्ट दर्जाच्या शौचालयाची निर्मिती झाल्याचे आपल्या कानावर आले आहे; मात्र यासंदर्भात अद्यापपर्यंत लेखी तक्रार प्राप्त नाही. तक्रार प्राप्त होताच संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात येईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई प्रस्तावित केली जाईल. आदिवासी बांधवांची लुबाडणूक झाली असल्यास त्यांनी तशा प्रकारच्या लिखित तक्रारी सादर कराव्यात, कुणाचीही अजिबात गय केली जाणार नाही.
- एस.जी. सोनवणेगटविकास अधिकारी, पंचायत समिती, जळगाव
शासनाच्या स्वच्छता अभियानास हातभार लागवण्यासाठी तसेच गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी शौचालय बांधकामासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. निकृष्ट सिमेंटच्या विटांऐवजी मातीच्या लाल विटांच्या वापरासाठी ग्रामस्थांची आग्रह आहे. शौचालयांचा दर्जा इतका सुमार नाही.- सुरेश मुझाल्दासरपंच, भिंगारा-चाळीसटापरी, ग्रामपंचायत
भिंगारा गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चाळीसटापरी येथील शौचालयाचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. शोषखड्डा आणि पायाशिवाय शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच काही शौचालयांचे बांधकाम न करताच रक्कम काढण्यात आली आहे.- जगदीश खरतसदस्य, चाळीसटापरी-भिंगारा, ग्रामपंचायत
शौचालयांची निर्मिती करताना अतिशय निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केल्या जात आहे. त्याचप्रमाणे अनुदानापैकी ५00 रुपये मला देण्यात आले. १२ हजार रुपयांच्या धनादेशावर माझा अंगठा घेण्यात आला आहे. सिमेंटच्या विटांऐवजी मातीच्या लाल विटा वापरून आपल्याला शौचालय बांधून द्यावे, अशी आपली मागणी आहे.- भिकला मोती सोळंकेशौचालय लाभार्थी, चाळीसटापरी-भिंगारा, ग्रामपंचायत
-