लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा: परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी देऊळगावराजा तालुक्यातील भिवगाव जुमडा या गावात वादळी वारा व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. सोबतच शिवसेना पदाधिकार्यांशी संवादही साधला. दरम्यान, देऊळगाव मही येथे बसस्थानक उभारण्यासंदर्भात भाजपच्या पदाधिकार्याने त्यांच्याकडे मागणी केली असता ‘सरकार आमचं नाही, भाजपचं आहे; तुमच्याच पक्षाकडे मागणी करा’, असा टोला लगावला. त्यामुळे देऊळगाव राजा तालुक्यातील गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्याच्या मुद्दय़ाऐवजी भाजपला लगावलेल्या टोल्याचीच चर्चा अधिक झाली.यावेळी आ.डॉ. शशिकांत खेडेकर, तालुका प्रमुख दादाराव खार्डे, माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे, पालिका उपाध्यक्ष पवन झोरे, नगरसेवक नंदन खेडेकर, धनशीराम शिंपणे, वसंतअप्पा खुळे, जगदीश कापसे, गोपाल व्यास, गिरीश वाघमारे, रणजित काकड, अविनाश डोईफोडे, भगवान खंदारे, अनिल चित्ते, प्रकाश राजे, संतोष सिनगारे, राजू शिंगणे, प्रल्हाद काकड, संदीप कटारे, सय्यद निसार, सचिन व्यास, तुषार शिंपणे, विष्णू वखरे प्रामुख्याने उपस्थित होते.या पाहणीदरम्यान परिवहन मंत्र्यांना विविध मागण्यांचेही निवेदन सामाजिक संघटनांनी दिले. धनशीराम शिंपणे यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा ते सातारा व्हाया देऊळगावराजा अशी शिवशाही बस सुरू करण्याची मागणी केली. युवा सेनेचे सचिन व्यास यांनी पोलीस भरतीच्या जागा वाढवण्याची, भाजपाचे देऊळगावमही शहर अध्यक्ष कैलास राऊत यांनी देऊळगावमही येथे बसस्थानकाच्या मागणीचे निवेदन त्यांना दिले.याच कार्यक्रमातभाजपाचे कैलास राऊत यांनी देऊळगावमही येथे बसस्थानकाची मागणी केल्यानंतर रावते यांनी त्यांनी, ‘हे सरकार आमचं नाही, भाजपाचे आहे. तुमच्या पक्षाकडेच ही मागणी करा,’ असा सल्ला कैलास राऊत यांना दिला. निवेदन घेऊन आलेल्या भाजपाच्याच नव्हे तर सेनेसह सामान्य नागरिकांच्या मागण्यांचेही त्यांनी समाधान केले नाही.
भ्रमणध्वनीवर जिल्हा प्रमुखांना सुनावले खडे बोलशिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत हे अनुपस्थित असल्याचे पाहून ना. रावते यांनी विचारणा केली असता व्यापारी सेनेच्या कार्यक्रमात असल्याने ते आले नसल्याचे दादाराव खार्डेंनी सांगितले. यावर लगेच ना. रावते यांनी जिल्हाप्रमुख बुधवत यांना कॉल करून जाब विचारला. मंत्री मोठा की व्यापारी सेना मोठी? जिल्हय़ात मंत्री आल्यानंतर तुम्ही हजर पाहिजे. ना. रावते यांनी मोबाइलचा स्पीकर ऑन केल्याने हा संवाद उपस्थितांना ऐकावयास मिळाला.
देऊळगावराजा बसस्थानकाचा प्रश्न गाजलाबसस्थानकाच्या आवारातील संपूर्ण जागेत संरक्षक भिंतीचे काम आ.डॉ. शशिकांत खेडेकरांनी यांनी मंजूर करून आणल्यानंतर २८ लाख रुपयांच्या कामाला सुरुवात झाली होती. सृष्टी कंन्स्ट्रक्शनने युद्धपातळीवर कामाला प्रारंभ केला होता. चाळीस टक्के काम पूर्ण झाल्यानंतर एका नागरिकाने आक्षेप घेत जागेवर हक्क दाखवला. महामंडळाचे डेप्युटी इंजिनिअर बायस यांनी कुठल्याही कागदपत्राची शहानिशा न करता वा कोर्टाचा स्टे नसतानाही हे काम थांबवण्याचा निर्णय घेतला. आ. खेडेकरांनी हा मुद्दा समोर आणताच ना. रावते यांनी मुख्य अभियंता यांना विचारणा केली. कार्यकारी अभियंतांनी बायस यांना सूचना दिल्याने शनिवारी सकाळी महामंडळाचे अधिकारी हे काम सुरू करण्यासंदर्भात येणार आहेत, असे सांगण्यात आले.