बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील भोन येथील प्राचीन बौद्ध स्तूप व त्याचे अवशेष जिगाव सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येत असून भारतातील ही पुरातन ओळख चिरंतर टिकून राहण्यासाठी भारतीय पुरातन खात्याने हे बौद्ध स्तूप व त्याचे अवशेष जतन करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी प्राचीन बौद्ध स्तूप बचाव संघर्ष समितीने राज्य शासनाकडे केली आहे.
जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संग्रामपूर तालुक्यातील भोन येथील प्राचीन बौद्ध स्तूप हा संपूर्ण परिसर या जिल्ह्यातील होणाऱ्या जिगाव सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येतो. प्रकल्पाला सन २०१७-२०१८ मध्ये गती मिळाली असून त्यांचे सुधारित अंदाजपत्रक ११ हजार ४४१ कोटींचे केंद्रशासनास सादर केल्याचे कळते. भारतीय पुरातन विभाग नवी दिल्ली यांनी यास ना हरकत प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहे. मात्र डेक्कन कॉलेज, पुणे येथील पुरातत्व विभागाच्या २०१० साली केलेल्या उत्खननामध्ये सदर परिसर प्राचीन बौद्ध स्तूप होता व त्याचे अवशेष आजही येथे आहेत हे सिद्ध झालेले आहेत. मात्र प्रारंभिक संशोधन झाल्यानंतर त्याची कोणतही दखल संबंधित विभागाने घेतलेली निदर्शनास येत नाही. ज्याप्रमाणे आंध्र प्रदेशातील नागार्जुन कोंडा येथील प्राचीन बौद्ध पुरावशेषाचे उत्खनन करून ते संग्रहालयात जतन केलेले आहेत. त्याचप्रमाणे विषयंकित कामाबाबत कार्यवाही करणे निकडीचे आहे. याबाबत बैठक घेवून आवश्यक कार्यवाही तातडीने करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर रमेश घेवंदे, राहुल दाभाडे, एस. एल. डवरे, कुणाल पैठणकर, प्रशांत बोर्डे, भिकाजी मेढे, अनंता मिसळ आदींची स्वाक्षरी आहे़
पर्यटनास मिळणार चालना
या प्राचीन बाैद्ध स्तुपांची जपवणूक केल्यास त्याचा जिल्ह्याला लाभ मिळणार आहे़ येथे पर्यटक, विदेशी पर्यटक, विदेशी अभ्यासक, भारतातील अभ्यासक या ठिकाणी भेटी देतील. यामुळे जिल्ह्यातील लोकांना रोजगाराची संधीसुद्धा उपलब्ध होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बुडीत क्षेत्रात भाग गेल्यानंतर याबाबतची कार्यवाही करणे अशक्यप्राय हाेणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे़