३ जानेवारीपासून जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येत असलेला सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव या कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे. सर्व कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने सोशल मीडियामार्फत सुरू आहेत. दरम्यान, ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजात जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला जिजाऊ जन्मस्थळ अर्थात राजवाड्यावर दीपोत्सव सोहळा होईल. त्यानंतर रात्री ८ वाजता जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम जिजाऊ सृष्टीवर पारपडेल, असे सुभाष कोल्हे यांनी सांगितले. १२ जानेवारी रोजी मुख्य जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात राजवाडा येथे मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, प्रमुख जोडप्यासह सकाळी ६ वाजता महाजुनेने होईल. सकाळी ९ वाजता जिजाऊ सृष्टीवर ध्वजारोहण होईल. त्यानंतर ९ ते ११ दरम्यान मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षेखाली व राज्याचे अन्न व अैाषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम सुरू होईल.
पुरस्कार प्रदान करणार
याच कार्यक्रमात मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा सर्वोच्च असा ‘मराठा विश्वभूषण’ पुरस्कार राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांना प्रदान करण्यात येईल. यासोबतच आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर आयएएस झालेल्या दिव्यांग प्रांजली पाटील यांना ‘जिजाऊ पुरस्कार’ तसेच कर्नाटकमध्ये सामाजिक कार्यात मोठे योगदान देणारे यशवंत सूर्यवंशी यांना ‘मराठा भूषण’ पुरस्कार प्रदान केल्या जाईल. या कार्यक्रमानंतर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांचा मनोगत व समारोपीय मार्गदर्शनाचा कार्यक्रम होईल.
संत चोखामेळा महाराज जन्मस्थळी महापूजा
यासोबतच १४ जानेवारी रोजी मेहुणा राजा येथे संत चोखामेळा महाराज यांच्या जन्मस्थळी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी यांच्या हस्ते महापूजा होईल. हा कार्यक्रमही समाज माध्यमांवर प्रसारित होईल.