रफिक कुरेशी / मेहकर (जि. बुलडाणा ) : केंद्र व राज्य सरकारच्यावतीने गाव तेथे मैदान, व्यायामशाळा आदी कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विविध योजना राबविल्या जातात; मात्र पंचायत समिती युवा खेळ व क्रीडा अभियानांतर्गत तालुक्यातील १४ गावांसाठी आलेला १४ लाख रुपये निधी कागदोपत्रीच खर्ची झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे, त्यामुळे गाव तेथे मैदान या संकल्पनेचे तीनतेरा वाजले आहेत.शासनाच्यावतीने सुरू केलेल्या पायका पंचायत युवा खेळ व क्रीडा अभियानाच्या निधीचा तालुक्यातील १४ गावांमध्ये दुरूपयोग झाल्याने सदर योजनेंतर्गत मैदाने दिसत नाहीत. या मैदानासाठी मिळालेला निधी कागदावरच खर्च झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आभ्यासाबरोबरच खेळाचेदेखील शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने पंचायत युवा खेळ व जिल्हा क्रीडा अभियान २00८-0९ या सत्रापासून राबविण्यात येत आहे. यामध्ये ग्रामपंचायत पातळीवर सचिव व सरपंच यांना ई-क्लासच्या जमिनीवर अथवा शाळेच्या खुल्या जागेत मैदान तयार करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकार्यांकडून एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला आहे. त्यामध्ये तालुक्यातील डोणगाव, अंजनी बु., शेलगाव, घाटबोरी, देऊळगाव साकर्शा, देऊळगाव माळी, जानेफळ, लोणी गवळी, बेलगाव, गोहोगाव, उकळी, सोनाटी, विश्वी, कळंबेश्वर आदी ग्रामपंचायत सचिवास एकूण १४ लाख रुपये धनादेश प्राप्त झाला आहे.
शासनाच्या ‘गाव तेथे मैदान’ संकल्पनेचे तीनतेरा
By admin | Published: March 14, 2015 11:49 PM