सिंदखेडराजा येथे राजे लखोजीराव जाधव यांना अभिवादन
सिंदखेडराजा : राजे लखोजीराव जाधव यांचा पराक्रम सर्वश्रुत आहे. त्यांनी या भागासाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहण्यासारखे आहे. त्यांच्या पराक्रमाचा इतिहास अधिक प्रखरतेने पुढे आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी येथे केले.
राजे लखोजीराव जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त राजेंच्या समाधिस्थळी रविवारी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी डॉ. शिंगणे यांनी सिंदखेडराजा आणि परिसरातील ऐतिहासिक ठेवा जतन करणे जसे सरकारची जबाबदारी आहे, त्याचप्रमाणे नागरिकांनीही याकडे लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन करून सरकार हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगितले. राजे लखोजीराव जाधव यांची समाधी जगातील सर्वोत्तम आणि सर्वात मोठ्या असलेल्या समाधिस्थळांपैकी एक असल्याने याला जागतिक महत्त्व आहे असे सांगून डॉ. शिंगणे यांनी तरुणांनी इतिहास आणि इतिहास पुरुषांचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. सोबतच आपला ऐतिहासिक ठेवा जतन करण्यास प्राधान्य द्यावे, असेही स्पष्ट केले.
कार्यक्रमाला जाधव वंशज शिवाजीराव जाधव, माळेगाव येथील अभयसिंह राजे, नियोजन समिती सदस्य ॲड. नाझरे काजी, नगराध्यक्ष सतीश तायडे, संजय राजे, पंडित खंदारे यांच्यासह शहरातील अनेकांची उपस्थिती होती.
पुतळा उभारण्याची मागणी
राजे लखोजीराव जाधव यांचा पूर्णाकृती पुतळा राजवाडा परिसरात उभारला जावा, अशी अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र अजूनही ही मागणी पूर्ण होत नाही. राजेंचा पूर्णाकृती पुतळा लवकरात लवकर उभारला जावा, अशी आग्रही मागणी जाधव वंशज शिवाजी राजे यांनी या कार्यक्रमप्रसंगी केली.