लोणार (बुलडाणा) : पर्यावरण संवर्धनासोबतच बुलडाणा जिल्ह्यात टुरिझम सर्कल विकसित करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोणार येथे दिल्या. शुक्रवारी त्यांनी मातृतीर्थ सिंदखेड राजा आणि जागतिक आश्चर्य असलेल्या लोणार सरोवरास भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी लोणार येथील एमटीडीसीच्या विश्रामगृहामध्ये लोणार सरोवर विकास आराखड्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते.
शुक्रवारी सकाळी प्रथम त्यांनी माँसाहेब जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक राजवाड्याची पाहणी केली. त्यानंतर दुपारी त्यांनी लोणार सरोवर, धारातीर्थ परिसराला भेट देऊन ऐतिहासिक सिंदखेड राजा आणि लोणार पाहण्याचे आपणास भाग्य लाभल्याचे वक्तव्य केले. सोबतच जागतिक पर्यटकांचाही येथे ओढा निर्माण होऊन येथील अर्थकारण विकसित कसे होईल यास प्राधान्य देण्याची आवश्यकता व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे बंधूही होते.
त्यानंतर त्यांनी एमटीडीसीच्या विश्रामगृहावर लोणार दौरा आढावा सभेमध्ये जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, नियोजन विभागाचे अधिकारी, पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक व्ही. एस. नायर, वरिष्ठ संवर्धन साहाय्यक एच. बी. हुकरे, वन्यजीव विभागाचे अधिकारी, एमटीडीसीचे अधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.