बुलडाणा: पाणीपुरवठा करणार्या टँकर्समधून नियमीत पाणीपुरवठा होत नाही. टँकर अनेकवेळा गावात जातच नाही; मात्र पाणीपुरवठा केल्याचे कागदोपत्री दाखविले जाते. पाणी पुरवठयाच्या या पद्धतीवर जिल्हा प्रशासनाचे लक्ष रहावे, यासाठी आता टँकरवर जीपीएस सिस्टीम लागणार आहे. अल्प, अत्यल्प पावसामुळे ग्रामीण व नागरी क्षेत्रात बरेचदा पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. त्याअनुषंगाने भविष्यातील पाणीटंचाई निवारणार्थ संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून विविध आदेश पारित करण्यात आले आहेत. गत पाच वर्षात टँकर्सने पाणी पुरवठा केलेली गावं, तालुके, तसेच वाड्यांची यादी शासनस्तरावर तयार करण्यात आली. यातून समोर आलेली आकडेवारी संभ्रम निर्माण करणारी आहे. या प्रकारावर शासकीय यंत्रणेचे लक्ष रहावे, यासाठी संभाव्य टंचाई कृती आराखड्यात टँकर्ससाठी जीपीएसची तरतुद करण्यात आली. त्यानुसार पाण्याचा पुरवठा करणार्या टँकरवर जीपीएस (ग्लोबल पोझिशन सिस्टीम) यंत्रणा बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे टँकर अपेक्षि त ठिकाणी गेला होता अथवा नाही, हे समजणे सुलभ होणार आहे.
*टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन निविदा स्विकारताना व टँकरधारकांशी करारनामा करतानाच टँकरवर जीपीस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेची देखभाल टँकर वाहतूकदारांना स्वखर्चातून करावी लागणार आहे. पाणी पुरवठा सुरळीत व्हावा आणि शासकीय खर्च र्मयादित रहावा, यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे.