धामणगाव धाड : लाॅकडाऊन काळात कोरोनाच्या भीतीपोटी गावाकडे येऊ नका. आहे तेथेच राहा. तुम्ही आल्यास कोरोनाच्या धोका वाढेल, असे म्हणत गावाबाहेरच रोखलेल्या चाकरमान्यांची ग्रामपंचायत निवडणुकीत निर्णायक भूमिका असणार आहे.
गावाबाहेर नोकरी - व्यवसायासाठी स्थलांतरित झालेल्या मात्र गावात मतदान असलेल्यांना गावातून मतदानासाठी गाड्या पाठवू का? अशी विचारणा हाेत आहे. या पार्श्वभूमीवर आतापासूनच सोशल मीडियावर पोस्ट सुरू झाल्या आहेत. नोकरीसाठी परगावी असणाऱ्या लोकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. गावात कामधंदा नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, औरगांबाद, मुंबई, नागपूरसारख्या ठिकाणी गेलेल्या ग्रामस्थांना लाॅकडाऊनचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. कोरोनामुळे कामधंदा बंद पडल्याने बाहेर असलेले लोक आपल्या गावी येऊ लागले. मात्र अनेकांना गावाच्या वेशीवरच अडविण्यात आले. त्यांना गावात येण्यास बंदी केली. अनेक दिवस त्यांना प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे त्यांना शेतात किंवा संस्थात्मक ठिकाणी क्वारंटाईन व्हावे लागले. अनलाॅकमध्ये अशी कुटुंबे पुन्हा नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी परतली. आता ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आणि परत अशा कुटुंबाची गावपुढाऱ्यांना आस्था वाटू लागली आहे. पूर्वी गावाकडे येऊ नका म्हणणारे निवडणुकांचे वातावरण तापल्याने आता मतदानाला गावाकडे या, गाड्या पाठवतो, असा आग्रह करताना दिसत आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत एकेका मतासाठी उमेदवारांना संघर्ष करावा लागणार आहे. यातील अनेक मतदार जिल्ह्याबाहेर कुटुंबासह असल्यामुळे मतदार यादीतील त्यांच्या नावामुळे आता त्यांना विशेष महत्त्व आले आहे.