लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या १८ जागांसाठी पोटनिवडणुक होत आहे. यासाठी पाच गावातील सहा जागांसाठी ११ नामनिर्देशन दाखल झाले होते. बुधवारी चार उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे चार ग्रा.पं. मधील पाच सदस्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. त्यामुळे बोराखेडी येथील फक्त एका जागेसाठी २७ मे रोजी निवडणुक होणार आहे.तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या १८ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीत सहा गावातील ११ जागांसाठी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही. बोराखेडी, परडा, अंत्री, वडगाव खंडोपंत येथील प्रत्येकी एक व खामखेड येथील दोन अशा एकूण सहा जागांसाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल होते. बुधवारी अर्ज माघारीच्या दिवशी ११ पैकी परडा येथील सारजाबाई सिताराम धनवटे, अंत्री येथील आशा सहदेव कोळसे, मंगला अनिल सुरडकर, ललीता कैलास जवरे या चार जणांनी माघार घेतली. त्यामुळे परडा येथील वार्ड क्रमांक तीनमधून संजय सिताराम धनवटे, खामखेड येथे वार्ड क्रमांक एकमधून कृष्णाबाई सुभाष गावंडे तर, वार्ड क्रमांक दोनमधून मंगला श्रीकृष्ण उचाडे, अंत्री येथील वार्ड क्रमांक दोनमधून वर्षा प्रदीप खोंड, वडगाव खंडोपंत येथील वार्ड क्रमांक तीनमधून मंगला सुरडकर यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. परंतु याबाबत अधिकृत घोषणा २९ मे रोजी होणार आहे. तसेच बोराखेडी ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक तीनमधील एका जागेसाठी यमुना संजय मोरे व मंगला ज्ञानदेव गायकवाड यांचे दोन अर्ज असल्याने याठिकाणी २७ मे रोजी मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एस.आर. राठोड , सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी रामचंद्र राठोड कामकाज पाहत आहे.
सात गावातील १२ जागा रिक्त राहणारडाभा ग्रा.पं. (एक जागा), खेडी (दोन), तरोडा (तीन), मोहेगाव (दोन), धामणगाव देशमुख (दोन), इब्राहीमपूर (एक) अशा सहा गावातील ११ जागांसाठी एकही नामांकन दाखल नाही. तसेच सारोळापीर येथील एका जागेसाठी आलेला एकमेव अर्ज छाननीत बाद झाला होता. त्यामुळे या सात गावातील १२ जागा रिक्तच राहणार आहे.