लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची मतांसह यादी प्रसिद्ध करण्यास अनेक तहसीलमध्ये दिरंगाई केली जात असल्याचा प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे, लगतच्या जिल्ह्यांमध्ये त्याच दिवशी यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. तर बुलडाणा, संग्रामपूर, मलकापूर, नांदुरा, देऊळगावराजा या ठिकाणी यादी दुसऱ्या दिवशीही तयार नसल्याचे चित्र दिसून आले.जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम पार पडला. त्यासाठीची मतमोजणी सोमवारी सर्वच तहसीलमध्ये झाली. विजयी उमेदवारांच्या नावाची तेथे घोषणा करण्यात आली. तर त्यांना निवडून आल्याचे प्रमाणपत्र अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर दिले जाणार आहे. त्यासाठी २१ जानेवारी ही मुदत ठरवून देण्यात आली. या मुदतीत निवडणूक आयोगाकडे निवडणुकीनंतर विविध नमुन्यात माहिती द्यावी लागते. त्यावर आयोगाकडून शिक्कामोर्तब केले जाते. विजयी उमेदवारांच्या नावाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर प्रमाणपत्र मिळण्याची सदस्यांना प्रतीक्षा आहे. तर त्याचवेळी आयोगाकडे अहवाल सादर करण्यात काही तहसीलमध्ये कमालीची दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे विजयी झालेल्या उमेदवारांची नावे आणि त्यांना मिळालेली मते, ही माहिती अद्यापही तहसीलदारांकडून मिळालेली नाहीत. या प्रकाराने विविध तहसीलमध्ये सुरू असलेला गोंधळ उघड होत आहे. त्यामध्ये जिल्हा मुख्यालय असलेले बुलडाणा, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर, देऊळगावराजा या तहसील कार्यालयाचा समावेश आहे. निवडणूक आयोगाला विविध नमुन्यांमध्ये माहिती सादर करावी लागते. ती न दिल्याने जिल्हा स्तरावरूनही ती प्रसिद्धीसाठी प्राप्त झालेली नाही. १९ जानेवारी राेजी रात्री पर्यंत काहीच तालुक्याचे अहवाल जिल्हा प्रशासनास सादर झाले हाेते.
संग्रामपूर:ऑनलाईन माहितीत गोंधळविशेष म्हणजे, आयोगाच्या वेबसाईटवर काही नमुन्यात माहिती ऑनलाईन भरावी लागते. ती भरताना संग्रामपूर तहसील कार्यालयाचा गोंधळ उडाला. त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत निवडणूक आयोगाशी संपर्क साधणे सुरू होते.
ग्रामपंचायतीमध्ये सर्वच उमेदवारांसह विजयी उमेदवारांची माहिती अंतिम करण्यास वेळ लागतो. त्यानुसार निवडणूक आयोगाने या सर्व कामांसाठी मुदत वाढवून दिली आहे. २९ जानेवारीपर्यंत ती आहे. त्यानुसार यंत्रणा काम करीत आहे. - दिनेश गिते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, ग्रामपंचायत, बुलडाणा.