लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : ग्रामपंचायतमध्ये प्रभागनिहाय निवडणूक लढताना त्या प्रभागात पॅनल बांधून दोन किंवा तीन जागांवर असलेल्या उमेदवारांना एकसमान चिन्ह मिळणार नाही. प्रत्येकाला स्वतंत्र चिन्ह देण्याची तरतूद आयोगाने केल्यामुळे प्रचार करताना आता उमेदवार आणि पॅनल प्रमुखांच्या नाकी नऊ येणार आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मुक्त चिन्हांपैकी कोणतेही चिन्ह निवडता येणार आहे. ज्या उमेदवाराने प्रथम उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तेथून चिन्हवाटपाची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतरच्या क्रमाने उमेदवारांच्या पसंतीनुसार चिन्हवाटप केले जातील. उमेदवाराने मागितलेले चिन्ह आधी कोणत्याच उमेदवाराला दिले नसेल तर त्याला त्याच्या पसंतीचे चिन्ह मिळणार आहे. एखाद्याने दिलेल्या पसंतीक्रमातील एकही चिन्ह वाटपासाठी उपलब्ध नसेल तर त्या उमेदवाराकडून वाटपासाठी शिल्लक असलेल्या चिन्हांपैकी एका चिन्हाची पसंती लेखी स्वरूपात घेण्यात येईल.
४० नवीन चिन्हांची भर! नव्या चिन्हांमुळे ही संख्या आता १९० झाली आहे. नव्या चिन्हांमध्ये पेन ड्राइव्ह, इस्त्री, क्रेन, पाव, केक, फलंदाज या चिन्हांसह सफरचंद, फणस, नारळ, द्राक्षे, अक्रोड, कलिंगड, अननस आदी फळांचा समावेश आहे. आले, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, फ्लॉवर, भेंडी, मका, भुईमूग, वाटाणे आदी नवीन प्रचार चिन्हे आहेत. त्याचबरोबर डिश अँटेना, दरवाजाची घंटी, दरवाजाची मूठ, ड्रिल मशीन, डंबेल्स, कानातले दागिने (कर्णफुले), विजेचे खांब, लिफाफा, एक्स्टेंशन बोर्ड, बासुरी, फूटबॉल, काटा, कारंजे, फ्राय पॅन, नरसाळे, द्राक्षे, हिरवी मिरची, हातगाडी, हार्मोनियम, हॅट ही चिन्हे आहेत.
नोंदवहीच्या नोंदीनुसार ठरणार क्रमएकापेक्षा अधिक उमेदवारांनी एकाचवेळी उमेदवारी सादर केली असेल अशावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा जो क्रमांक नोंदविलेला आहे, त्या क्रमानुसार उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात येणार आहे. एखादा उमेदवार एकापेक्षा अधिक प्रभागात निवडणूक लढवीत असल्यास त्यांना सारखेच चिन्ह वाटपात प्राधान्य राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.