लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचार्यांना किमान वेतन व राहणीमान भत्ता संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून मिळत होता. त्यामुळे अनेक कर्मचार्यांना महिना संपल्यावरही वेतन मिळण्यास उशीर होत होता. याबाबत ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या विविध संघटनेकडून वेतन वेळेवर मिळण्याची मागणी होत होती. यासंदर्भात शासनाच्या ६ जानेवारी २0१८ च्या एका आदेशान्वये ग्रामपंचायत कर्मचार्यांना वेतन ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून, याबाबत एचडीएफसी बँकेसोबत करणार करण्यात आला आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील १ हजार ५३५ ग्रामपंचायत कर्मचार्यांना होणार आहे.ग्रामपंचात कर्मचारी हासुद्धा ग्राम विकासाचा मुख्य घटक असल्यामुळे शासनस्तरावरून ग्रामपंचात कर्मचार्यांचे वेतन ग्रामसेवक व सरपंच यांच्यामार्फत दिले जात होते; मात्र प्रत्यक्ष ग्रामपंचात कर्मचार्यांना त्यांचे वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचार्यांना सण उत्सवाच्या काळातही वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. जिल्ह्यात एकूण ८६९ ग्रामपंचायती असून, त्यावर १ हजार ५३५ ग्रामपंचात कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना दरमहा ८४ लाख ४७ हजार ६00 रुपये वेतन देण्यात येते. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील ६६ ग्रामपंचातींवर १४४ कर्मचारी, चिखली तालुक्यात ९९ ग्रामपंचातमध्ये १९0 कर्मचारी, देऊळगाव राजा तालुक्यात ४८ ग्रामपंचातमध्ये ९0, मेहकर तालुक्यात ९८ ग्रामपंचातमध्ये १५६, लोणार तालुक्यात ५९ ग्रामपंचातमध्ये १0८, सिंदखेड राजा तालुक्यात ७९ ग्रामपंचातमध्ये १६३, खामगाव तालुक्यात ९७ ग्रामपंचातमध्ये १३८, शेगाव तालुक्यात ४७ ग्रामपंचातमध्ये ६८, जळगाव जामोद तालुक्यात ४७ ग्रामपंचातमध्ये ८२, संग्रामपूर तालुक्यात ५0 ग्रामपंचातमध्ये ८६ कर्मचारी, मलकापूर तालुक्यात ४९ ग्रामपंचातमध्ये ७५ कर्मचारी, मोताळा तालुक्यात ६५ ग्रामपंचातमध्ये १३८ कर्मचारी व नांदुरा तालुक्यात ६५ ग्रामपंचातमध्ये ९७ कर्मचारी कार्यरत आहेत.
एचडीएफसी बँकेसोबत करारनामाग्रामपंचायत कर्मचार्यांचे वेतन ऑनलाइन पद्धतीने संबंधित कर्मचार्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. सदर योजना राबविण्यासाठी ग्रामविकास विभाग व एचडीएफसी यांच्यात करार करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत कर्मचार्यांचे वेतन आता थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याने कर्मचार्यांना दिलासा मिळाला असून, त्यांना कुटुंबासमवेत विविध सण, उत्सव साजरे करण्यास अडचण निर्माण होणार नाही.- रामेश्वर डिवरे, सचिव,महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, बुलडाणा.-