लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: कोणत्याही प्रकारचा खरेदी व्यवहार केला नसताना आपली जागा ग्रामपंचायतीने दुसऱ्याच्या नावे केली, या संदर्भात केलेल्या तक्रारीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला दुरुस्ती करून देण्याचे आदेश दिल्यानंतरही ग्रामसेवक टाळाटाळ करीत असल्याची तक्रार सुलतानपूरचे शे. हमीद शे. हाशम यांनी केली.शे. हमीद यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुलतानपूर ग्रामपंचायत हद्दीत आपल्या नावे अनुक्रमांक ९३४ प्रमाणे नमुना ८ ला ४० बाय ५५ अशी २२०० स्क्वेअर फूट जागा आहे. ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या नावाने आहे; मात्र अलीकडेच ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवर खोडातोड करून माझी अर्धी जागा दुसऱ्याच्या नावाने केल्याचे उघड झाले. या संदर्भात आपण ग्रामसेवकाला विचारणा करून हा फरक कसा झाला असे विचारले असता हा बदल आपल्या कार्यकाळात झाला नसल्याचे सांगून त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. दरम्यान, आपण या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार केली असता लोणारचे गटविकास अधिकारी यांनी १२ मे २०१७ रोजी ग्रामपंचायतीचे सचिव यांना पत्र देऊन खरेदीचे कोणतेही व्यवहार झाले नसताना शे. हमीद यांच्या नावाची जागा दुसऱ्याच्या नावाने कशी झाली? याची विचारणा करून या प्रकरणी तातडीने ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवर नियमानुसार नोंद करून द्यावी, असे आदेश दिले. तथपि, सचिवाला आदेश देऊन एक महिना होऊनसुद्धा ग्रामपंचायत वरिष्ठांच्या पत्राला केराची टोपली दाखवत असून, नोंद करण्यास तयार नाही. तेव्हा तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी शे. हमीद शे. हाशम यांनी केली.
ग्रामपंचायतने जागा परस्पर दुस-याच्या नावे केली!
By admin | Published: June 26, 2017 10:15 AM