ओमप्रकाश देवकर
मेहकर : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात अनेक निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ९८ ग्रामपंचायत प्रशासनाने विविध दक्षता समित्या स्थापन करून विविध उपाययोजना राबविण्याचे काम सुरू केले आहे.
जिल्हाभरात कोरोना विषाणूची रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत जिल्ह्यात काही ठिकाणी लाॅकडाऊन, तर काही ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे. यामुळे ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ नये, म्हणून मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशीष पवार यांच्या मार्गदर्शनात ९८ ग्रामपंचायत प्रशासनाने यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, आरोग्यसेवक, सेविका, आशावर्कर, अंगणवाडीसेविका, मदतनीस, तलाठी, कृषी सहायक, पोलीसपाटील यांच्यासह अन्य विभागांचे कर्मचारी यांच्या दक्षता समित्या नेमून त्यांच्या बैठका घेण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोना दक्षता समितीच्या विशेष बैठका घेण्यात येत आहेत. गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, त्या दृष्टीने कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने गावांमध्ये लाउडस्पीकरद्वारे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यामध्ये तोंडाला मास्क बांधणे, आवश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडणे, शारीरिक आंतर पाळणे, वेळोवेळी साबणाने हात धुणे, खाजगी दवाखाने, किराणा दुकाने, पिठाची गिरणी इत्यादी ठिकाणी मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये. खाजगी आस्थापनामालकांना काेविडची चाचणी करून घेणे बंधनकारक करणे, हातपंपाने,विहिरीवर पाणी भरताना मास्क परिधान करणे बंधनकारक करावे. यासारख्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याकरिता दक्षता समित्या दक्ष झाल्या असून याची अंमलबजावणी करणे सुरू आहे.
१७ हजारांचा दंड वसूल
काेराेना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे काही जणांनी उल्लंघन केल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने १७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
काेट
तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी कोरोना विषाणूला न घाबरता शासनाच्या नियमांचे पालन करून शासनाला प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे. यासोबतच दक्षता समित्या गावांमध्ये ज्या सूचना करतील, त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी.
आशीष पवार, गटविकास अधिकारी, मेहकर