- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेणे बंद करण्यात आल्या. त्यामुळे अनेक विकासकामांना ब्रेक लागला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचे प्रस्ताव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव घेऊन शासनाकडे पाठवावे लागतात. मात्र, ग्रामसभाच झाल्या नसल्याने शौचालयाचे प्रस्ताव रखडले आहेत.जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर कलम १४४ लागू करण्यात आली. तसेच ग्रामसभा घेण्यासही बंदी घालण्यात आली. ग्रामसभेत संपूर्ण गावातील नागरिक एकत्र येतात. यामुळे कोरानाचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने ग्रामसभा घेण्यास परवानगी देण्यात आली नाही. फेबु्रवारी महिन्यापासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्यात आली नाही. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपचायतींना ग्रामसभेत ठराव घेऊन गरजवंत लाभार्थ्यांची नावाची यादी पंचायत समितीला पाठवावी लागते. या अंतर्गत अल्पभूधारक शेतकरी, अनूसूचित जाती, अनूसूचित जमाती, दारिद्य्र रेषेखालील व्यक्ती, अपंग, विधवा, परितक्त्या या लाभार्थ्यांना शौचालयाचा लाभ देण्यात येतो. ग्रामपंचायतला ग्रामसभेत ठराव घेवून गावातील लाभार्थ्यांची यादी शासनाला पाठवावी लागते. त्यानंतर यादी मंजूर होवून पंचायत समितीकडे येते. त्यानंतर शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले की नाही हे पंचायत समितीतील शाखा अभियंता पाहणी करतो, त्याचे छायाचित्र पाठविल्यानंतर अनुदान मिळते. शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तसेच शौचालयाचा वापर सुरू झाल्यानंतर अनुदान लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यात येते. शौचालयासाठी १२ हजार रूपये अनुदान देण्यात येते. मात्र, जिल्ह्यात ग्रामसभाच झाल्या नसल्यामुळे शौचालयाबाबतचा ठराव घेण्यात आला नाही.
गत दोन वर्षातील सर्व प्रस्ताव मंजूरखामगाव तालुक्यात २०१९-२० साली ९२७ प्रस्ताव शासनाकडून मंजूर होऊन आले होते. यापैकी १४ प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर अपात्र करण्यात आले. उर्वरीत लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले. २०२०-२१ साली ३३९ शौचालय मंजूर झाले होते. सर्वाना अनुदान मिळाले.
जिल्ह्यात १४४ कलम लागू आहे. ग्रामसभा घेतल्यावर गर्दी होते. मोठ्या ग्रामपचायतीत तर चार ते पाच हजार लोक एका ठिकाणी येवू शकतात. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामसभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे.- चंदनसिंग राजपूतगटविकास अधिकारी, पंचायत समिती, खामगाव.