लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासनाच्या फसव्या कर्जमाफीविरोधात शेतकरी संघटनेने रणशिंग फुंकले असून, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभांमध्ये कर्जमुक्ती व वीज बिल मुक्तीचे ठराव घेण्याचे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी तुटपुंजी असून, या कर्जमाफीचा कुठलाच फायदा शेतकर्यांना होणार नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेने रणशिंग फुंकले असून, विविध टप्प्यांमध्ये पुढील काळात आंदोलने केली जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभांमध्ये कर्जमुक्ती व वीज बिल मुक्तीचे ठराव घेतले जाणार आहेत. त्यानंतर सदर ठराव हे शेतकरी संघटनेतर्फे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पोहोचविण्यात येणार आहेत. म्हणून शेतकर्यांनी घेतलेले कर्ज हे अनैतिक असून, सरकारकडेच शेतकर्यांचे कर्ज आहे. म्हणून सरसकट कर्जमुक्ती व वीज बिल मुक्ती असे दोन प्रमुख विषयांचे ठराव स्वातंत्र्य दिनाच्या ग्रामसभांमध्ये घेण्यात यावे. या ठरावांची प्रत संबंधित गावाच्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व जिल्हा कार्यलयांकडे पाठवावी, असेही आवाहन शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
पत्रके वाटून जनजागृतीजिल्ह्यात ८७0 ग्रामपंचायती असून, शासनाच्या आदेशान्वये १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करून विविध विकासात्मक ठराव घेण्यात येणार आहेत. यावेळी विविध ठरावाला मंजुरात देताना कर्जमुक्ती व वीज बिल मुक्तीचे ठराव घ्यावेत, असे आवाहन शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत आवाहन करणारे पत्रक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावागावांत जाऊन वाटत असून, ग्रामस्थांमध्ये जनजागृती करीत आहेत.
शासनाच्या फसव्या कर्जमाफीविरोधात शेतकरी संघटना विविध आंदोलने करणार आहे. त्याचा एक भाग म्हणून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभांमध्ये कर्जमुक्ती व वजी बिल मुक्तीचे ठराव घेण्यात यावे आणि जनता ही शेतकर्यांच्या पाठीशी आहे, हे दाखवून द्यावे.-नामदेवराव जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य, शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य.