हर्षनंदन वाघ ।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासनाच्या आदेशान्वये नवीन शिक्षक भरती बंद असल्यामुळे व सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढल्याने जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ४६५ जागा रिक्त आहेत. त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक सत्रात असंख्य शिक्षकांवर अतिरिक्त भार राहणार असून, शासनाच्या नवीन धोरणानुसार बदल्या झाल्यास दुर्गम व अवघड क्षेत्रातील शाळा शिक्षकांविना राहणार आहेत.जिल्ह्यात येणाऱ्या जून महिन्यापासून शाळेच्या नवीन सत्राला सुरुवात होणार आहे. त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेतील शाळांनी तयारी सुरू केली आहे; मात्र यापूर्वी असलेला माहोल सध्या दिसून येत नाही. शासनाने नवीन धोरणानुसार बदल्या करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सर्वच शिक्षक धास्तावलेले आहेत. यापूर्वी बदली होणार नसल्यामुळे अनेक शिक्षक नवीन शैक्षणिक सत्राची तयारी करण्यासाठी सुटीतही शाळेवर जात होते. अनेक शिक्षकांनी शाळा डिजिटल करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत; मात्र आता बदली कोठे होणार? या विवंचनेत शिक्षक मंडळी दिसून येत आहेत. त्यात नवीन धोरणानुसार तीन वर्ष सेवा दिलेल्या दुर्गम व अवघड क्षेत्रातील शिक्षक कोठेही बदली मागणार असल्यामुळे त्या ठिकाणच्या शिक्षकांची बदली इतर ठिकाणी होणे क्रमप्राप्त आहे; मात्र मंजूर पदापेक्षा कार्यरत शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी असल्यामुळे दुर्गम व अवघड क्षेत्रातील शाळा शिक्षकांविना राहण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ज्या शाळेतील शिक्षकांची पदे रिक्त राहतील त्या शाळेवरील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. जिल्ह्यात आज रोजी १३ पंचायत समिती अंतर्गत ६ हजार ९६३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६ हजार ४९८ कार्यरत पदे असल्यामुळे ४६५ शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे दिसून येते. अवघड शाळेला शिक्षक मिळणे कठीणशासनाच्या नवीन धोरणानुसार अवघड शाळेवरील शिक्षकाला तीन वर्षानंतर कोणत्याही शाळेवर बदली मागण्याचा हक्क मिळणार आहे. त्यामुळे त्या शाळेवरील शिक्षकाची बदली क्रमप्राप्त आहे, तसेच बदली धोरणानुसार सर्वात शेवटी अवघड क्षेत्रातील शाळेवरील शिक्षकांची नियुक्ती होणार आहे; मात्र जिल्ह्यात शिक्षकांची ४६५ पदे रिक्त असल्यामुळे जिल्ह्यातील अवघड शाळेला शिक्षक मिळेल की नाही ? याबाबत शंका व्यक्त होत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसानकॉन्व्हेट संस्कृती रूजल्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. त्यात काही शिक्षकांनी डिजिटल शाळा करून विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत वळविण्यात यश आले होते; मात्र नवीन धोरणानुसार सर्वच शिक्षकांच्या बदल्या होणार असल्यामुळे अतिरिक्त परिश्रम घेण्यापासून शिक्षक दूर जात आहे. तर शिक्षकांची ४६५ पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध नसल्याने अनेक शिक्षकांवर अतिरिक्त भार येणार आहे. अशा अतिरिक्त कामांमुळे शिक्षक विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. अशीच परिस्थिती उर्दू शाळेबाबत होणार आहे.खासगी शाळांंकडे ओढ!जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिक्षकांची पदे पुरेशा प्रमाणात नसल्याने अनेक शिक्षकांवर अतिरिक्त भार येणार आहे. त्याचाच परिणाम म्हणून अतिरिक्त कामाच्या बोजामुळे शिक्षकांच्या शिकविण्याच्या पद्धतीत बदल होत आहे. त्यामुळे पालकांनी मराठी शाळेकडे पाठ फिरविली आहे. त्यामानाने खासगी शाळेतील शिक्षणपद्धती चांगली असल्याने विद्यार्थी संख्या वाढली आहे. खासगी शाळेत अव्वाच्यासव्वा फी घेतात, तरीही पालक तो खर्च नाइलाजाने करीत असतो. याशिवाय अनेक संस्थांनी आपल्या इंग्रजी शाळेत विविध उपक्रम घेण्यात येतील, विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा पुरविण्यात येतील, याबाबत हमी दिल्याने बहुतांश पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढला आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
By admin | Published: May 18, 2017 12:32 AM