बुलडाणा: ग्रामसेवक हा ग्रामीण जनता व प्रशासनामधील दुवा आहे. शासनाच्या विविध योजना राबविण्याचे काम ग्रामसेवक करीत असतात, मात्र ग्रामसेवकांना ग्रामीण भागात आता नोकरी करणे कठीण झाले आहे. अनेक समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो, त्यातच अलीकडे खेडयामध्ये गावपुढाऱ्यांची संख्या वाढत असल्याने ग्रामसेवकांच्या कामात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढत असून ग्रामसेवक नोकऱ्यांचा राजीनामा देत असल्याचे प्रतिपादन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे केले. बुलडाणा येथे दोन दिवसापूर्वी ग्रामसेवक राज्य कार्यकारीणीची सभा झाला. त्या सभेस त्यांना प्रमुख पाहूणे म्हणून निमंत्रीत करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तुपकर यांच्या कार्याचा गौरव करीत राज्य कार्यकारीणीने त्यांचा सत्कार केला. दरम्यान, पुढे बोलताना तुपकर म्हणाले की, सर्व विभागामध्ये सरकारी नोकर्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचार्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. शासनाच्या अनेक योजनांची अंमजबजावणी करताना ह्या योजना ग्रामीण भागातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचवितांना ग्रामसेवकावर कामाचा अतिरिक्त भार पडतो. ग्रामसेवकाला सतत लोकांच्या समस्यांना तोंड दयावे लागते. दरम्यान, ग्रामसेवकांनी सुद्धा आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पारपाडावे, असे आवाहन पुढे बोलताना तुपकर यांनी केले. ग्रामसेवक राज्य कार्यकारीणीच्या या बैठकीस प्रामुख्याने जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष उमेशचंद्र चुलबुले, राज्य ग्रामसेवक युनीयनचे अध्यक्ष एकनाथराव ढाकणे, राज्य सरचिटणीस प्रशांद जामोदे, उपाध्यक्ष सूचित घरत, जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, संजय चोपडे, जि.प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक काळे, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामसेवक हा जनता व प्रशासनामधील दुवा : रविकांत तुपकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:46 PM
अलीकडे खेडयामध्ये गावपुढाऱ्यांची संख्या वाढत असल्याने ग्रामसेवकांच्या कामात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढत असून ग्रामसेवक नोकऱ्यांचा राजीनामा देत असल्याचे प्रतिपादन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे केले.
ठळक मुद्दे बुलडाणा येथे दोन दिवसापूर्वी ग्रामसेवक राज्य कार्यकारीणीची सभा झाला.यावेळी तुपकर यांच्या कार्याचा गौरव करीत राज्य कार्यकारीणीने त्यांचा सत्कार केला.