खामगाव : पंचायत समितीमध्ये कार्यरत ६५ ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने गत ४ महिन्यां पासून त्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात आला आहे. दुसरीकडे पं.स.अंतर्गत कार्यरत इतर कर्मचार्यांना मात्र मुख्यालयी राहण्याच्या जाचक अटीतून वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खामगाव पंचायत समिती अंतर्गत १३६ गावे असून ९६ ग्रामपंचायती आहे. पंचायत समितीमधील कृषी, बांधकाम आरोग्य, पशुसंवर्धन पंचायत, लेखा शिक्षण तसेच सामान्य प्रशासन विभाग सांभाळण्यासाठी १२00 च्या जवळपास कर्मचारी विविध विभागात कार्यरत आहेत. पंचायत विभागाच्या कामकाजासाठी ६८ ग्रामसेवक व ७ ग्रामविकास अधिकार्यांच्या पदांची मंजुरात आहेत. यामध्ये ६ ग्रामविकास अधिकारी तर ४२ नियमित व १७ कंत्राटी स्वरुपात ग्रामसेवक कार्यरत आहेत. पिंप्री धनगर जयराम गड कदमापूर, चितोडा, कोलोरी, किन्ही महादेव, उमरा अटाळी, पोरज, झोडगा, कंझारा व कुंबेफळ येथील ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेत. कार्यरत ५९ ग्रामसेवकांचा घरभाडे भत्ता गत जानेवारी महिन्यापासून पं.स.प्रशासनाने बंद केला आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी प्रकाश वाघ यांनी ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाही, या कारणावरुन ग्रामसेवकांचा घरभाडे भत्ता बंद केला असल्याचे ग्रामसेवक संघटनेचे म्हणणे आहे. ग्रामसेवक मुख्यालयी राहत असल्यास त्यांनी ग्रामसभा अथवा मासिक सभेचा ठराव घेवून पं.स.कडे सादर करावा अशी अट घातली गेली आहे. त्यामुळे गत चार महिन्यांपासून ग्रामसेवकांना घरभाडे भत्ता मिळाला नाही. दुसरीकडे ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी वगळता इतर सर्वच विभागातील कर्मचार्यांना मात्र घरभाडे भत्ता नियमित मिळत आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता यामधील बहु तांश कर्मचारीही मुख्यालयी राहत नाहीत. हे कर्मचारीसुद्धा बाहेरगावहून ये-जा करतात. तरीही त्यांना घरभाडे भत्ता दिला जा तो. यामुळे पं.स.प्रशासन कर्मचार्यामध्ये दुजाभाव करत असल्याचे स्पष्ट दिसून आले. घरभाडे भत्ता मिळण्यासाठी ग्रामसेवकांनी वेळोवेळी पं.स.कडे मागणी केली; परंतु त्यांना मुख्यालयी राहण्याची ठरावाची अट पुर्तता केल्यानंतरच घरभाडे भत्ता मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रामसेवकांचा घरभाडे भत्ता बंद!
By admin | Published: May 03, 2015 2:05 AM