मोताळा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील तलाठी एन.टी. उज्जैनकर यांनी केलेल्या शासकीय अनुदान घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्प्यात असून, हा घोटाळा ४२ लाखपर्यंत गेला असल्याचे समजते. चौकशी समिती शनिवारी या घोटाळ्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करणार असून, जिल्हाधिकारी यातील दोषींवर काय कारवाई करतात, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत उघडकीस आलेल्या जवळपास ४२ लाखांच्या घोटाळ्यात तहसील कार्यालयात मानधन तत्त्वावर कार्यरत फर्दापूर येथील एका कर्मचार्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे वेगवेगळ्या गावातून नुकसानीचे अनुदान काढल्याचे समोर आले आहे. तसेच सारोळा मारोती येथील संतोष मारोती घाटे या भूमिहीन व्यक्तीच्या नावावरसुद्धा वेगवेगळ्या गावातून जवळपास २ लाखपर्यंत अनुदान सदर तलाठय़ामार्फत काढण्यात आले आहे, अशा अनेक संशयितांची नावे चौकशी समितीने शोधून काढले असून, बँक स्टेटमेंट व गावनिहाय चौकशी केली अस ता सदर घोटाळ्यातील रकमेचा आकडा आतापर्यंत ४२ लाख रुपयांच्या घरात असल्याचे कळते. तलाठी उज्जैनकर यांच्या अख्त्यारीत असलेल्या रिधोरा, पुन्हई, बोराखेडी हे तीन गाव, तर मूर्ती, वारुळी, वाघजाळ व परडा या चार गावांचा अतिरिक्त प्रभार होता. या सात गावा तील बोगस शेतकर्यांचे नाव लाभार्थी यादीत समाविष्ट करून लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे. चौकशी समितीने या प्रकरणाची कसून चौकशी केली असता ज्या शेतकर्यांचे नाव सातबारा व ८ ह्यअह्ण मध्ये नोंद नाही तसेच जे गावात अस्तित्वात नाही अशा लोकांची नावे लाभार्थी यादीत आढळून आले. तसेच एकाच नावाच्या व्यक्तीला वेगवेगळ्या गावातून अनुदान वाटप केल्याची बाब पुढे आली आहे. चौकशी समितीचे कार्य अंतिम टप्प्यात आले असून, आज शनिवारपर्यंत सदर समिती आपला अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणार असल्याची माहिती चौकशी समितीचे प्रमुख नायब तहसीलदार एस.एम. चव्हाण यांनी दिली.
अनुदान घोटाळा ४२ लाखांच्या घरात
By admin | Published: May 15, 2015 11:42 PM