बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात आर्थिक दुर्बल घटकांतील लाेकांना त्रास हाेऊ नये, यासाठी शासनाने पॅकेज जाहीर केले हाेते. पॅकेजअंतर्गंत निराधारांना एक हजार रुपयांचे अनुदान देण्याची घाेषणा शासनाने केली हाेती. जिल्ह्याला हा निधी प्राप्त झाला असून, येत्या दाेन दिवसांत निराधारांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात येणार आहे.
गत काही दिवसांपासून काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने संचारबंदी लागू केली असून, कडक निर्बंध लागू केले आहेत. निर्बंधाच्या काळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने पॅकेजची घाेषणा केली हाेती. या पॅकेजअंतर्गंत माेलकरीण, बांधकाम मजूर, निराधारांना मदत देण्याची घाेषणा केली हाेती. पहिल्या टप्प्यातील निर्बंध संपल्यानंतरही जिल्ह्यातील निराधारांना अनुदान मिळाले नव्हते. अखेर मे महिन्यात जिल्हा प्रशासनाकडे अनुदान प्राप्त झाले असून, येत्या एक ते दाेन दिवसांत निराधारांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात येणार आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या पाच योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
धनादेश ट्रेझरीत जमा
विविध याेजनांतील लाभार्थी निराधारांच्या खात्यात अनुदान जमा करण्यासाठी ट्रेझरी धनादेश जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या एक ते दाेन दिवसांत लाभार्थ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा करण्यात येणार असल्याचे बुलडाणाचे तहसीलदार रूपेश खंडारे यांनी सांगितले.
बॅंक उघडण्यापूर्वीच लागतात रांगा
बुलडाणा शहरातील स्टेट बॅंक परिसरात निराधार वृद्ध अनुदान आले का, पाहण्यासाठी, तसेच पैसे काढण्यासाठी बँक उघडण्यापूर्वीच रांगा लावतात़. हीच स्थिती शहरातील इतर बॅंकामध्येही आहे. ग्रामीण भागातही बॅंकामध्ये वृद्धांच्या रांगा लागत आहेत. सध्या बॅंकाच्या कामकाजाचा वेळ दुपारी २ वाजेपर्यंतच असल्याने माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत आहे. त्यामुळे निराधार वृद्ध काेराेना संक्रमणाची भीती असूनही अनुदानासाठी गर्दी करीत आहेत.
काेट
एप्रिल महिन्याचे अनुदान मिळाले. शासनाने एक हजार रुपये अनुदान अजूनही मिळाले नाही. बॅंकांमध्ये हाेणारा त्रास कमी करण्यासाठी शासनाने उपाययाेजना कराव्यात़.
किसन वानखडे, लाभार्थी
अनुदान जमा झाले किंवा नाही, याची माहिती मिळत नाही. त्यासाठी बॅंकेत चकरा माराव्या लागतात. अनेकांजवळ माेबाइल नाही. असले तरी संदेश वाचता येत नाही. त्यामुळे अनुदान मिळाल्यावर त्याची माहिती देण्याची गरज आहे.
सखाराम इंगळे, लाभार्थी
निराधार लाभार्थ्यांना बॅंकेमध्ये रांगा लावाव्या लागतात. निराधारांसाठी बॅंकांनी स्वतंत्र टेबल सुरू केल्यास दिलासा मिळेल. काेराेना संक्रमणाच्या काळातही बॅंकामध्ये रांगा लावाव्या लागत आहेत.
तुकाराम पाटील, लाभार्थी
काेराेना संक्रमणाच्या काळातही नियमित अनुदान मिळत असल्याने आधार आहे. बॅंकामध्ये रांगा लावाव्या लागत असल्याने, काेराेना संसर्गाचा धाेका आहे. त्यावर शासनाने उपाययाेजना कराव्यात़.
हिंमतराव जाधव, लाभार्थी