लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र आणत, स्वराज्याची स्थापना केली. तर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुरूषांनी जाती व्यवस्थेच्या बिमोडासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला. मात्र, या महापुरूषांना अभिप्रेत असलेल्या सुराज्यापासून आपण कोसोदूर असल्याची खंत छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी येथे व्यक्त केली.
रावबहाद्दूर केशवराव जानराव देशमुख यांच्यावतीने आयोजित शिक्षण परिषदेच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित सामाजिक ऐक्य परिषद तथा श्रीमंत शिवाजीराव वामनराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सामाजिक ऐक्य परिषदेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार अॅड. आकाश फुंडकर, आ. हर्षवर्धन सपकाळ, मानवाधिकार आयोगाचे सदस्य भगवंतराव मोरे, नगराध्यक्षा अनिता डवरे, शिवाजीराजे जाधव, इंद्रसेन देशमुख , जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, नगराध्यक्ष नाझेर काझी, माजी आमदार माणिकराव गावंडे, माजी आमदार नाना कोकरे, दादासाहेब कविश्वर यांच्यासह सत्कारमूर्ती श्रीमंत शिवाजीराव वामनराव देशमुख, सुमती देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी संभाजी राजे म्हणाले की, जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी चारही महापुरूषांनी शेवटच्या श्वासापर्यंत जीवाचे रान केले. शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाती व्यवस्थेची संकल्पना अजिबात मान्य नव्हती. मात्र, आम्ही आजही या महापुरूषांनाच जाती-जातीत विभागायला निघालो आहोत. हेच आजच्या समाजव्यवस्थेचे अपयश आहे. मात्र, शिवाजीराव देशमुख यांच्या सारख्या काही मोजक्या लोकांकडून महापुरुषांच्या आदर्श जोपासल्या जात आहे. त्यामुळे ते नव्या पिढीसाठी आशेची किरणं असल्याचेही संभाजी राजे शेवटी म्हणाले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार देवेंद्र देशमुख, सौ. शीतल देशमुख, अभिषेक देशमुख, सौ.राधिका देशमुख, सयाजी देशमुख, आर्यमन देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक देवेंद्र देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजेश मिरगे यांनी केले. आभार तेजेंद्रसिंह चव्हाण यांनी मानले.
स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही!
खामगाव शहरातील राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाचे काम गतीने पुढे न्यावे. या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, महापुरूषांना जाती धर्मात आणि राजकारणात अडकवू नका, असे आवाहनही छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी केले.