सिंदखेडराजा : शहर परिघात असलेल्या जंगलात वन पर्यटन आणि बंदिस्त प्राणी उद्यान केल्यास भविष्यात याला मोठे महत्त्व प्राप्त होऊ शकते. राजकीय आणि प्रशासनिक व्यवस्थेने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
सिंदखेडराजा शहराच्या १० किलोमीटर परिसरात वनविभागाची जवळपास ५ हजार एकर जमीन आहे. त्यापैकी नशिराबाद, शिवणी आणि अंचली या गावाजवळ तीनशे हेक्टर वनसंपदा असलेल्या पट्ट्यात वनपर्यटन केले गेल्यास या भागातील हा मोठा नैसर्गिक प्रकल्प होऊ शकतो. डिसेंबर २०२० मध्ये नागपूरमधील गोरेवाडा येथे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय वनपर्यटन आणि प्राणी उद्यान अस्तित्वात आले आहे. १ हजार हेक्टरवर हा प्रकल्प उभा असून येथे बंदिस्त प्राणिसंग्रहालय, वनउद्यान, जंगल सफारी असे अनेक अनुभव घेता येतात. अल्पावधीत या प्रकल्पाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
नागपूरमधील याच प्रकल्पाच्या धर्तीवर सिंदखेडराजा परिघातील वनजमिनीवर असा प्रकल्प उभा राहिल्यास मध्य महाराष्ट्रातील हा एक महत्त्वाचा वनपर्यटन प्रकल्प ठरू शकतो. या भागात विपुल वनसंपदेसह अनेक जंगली प्राणी, नैसर्गिक पाणवठे, पाझर तलाव मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रित येऊन हा प्रकल्प पूर्ण करण्याची आणि राजकीय व्यवस्थेने याला पाठबळ देण्याची गरज आहे.
दरम्यान, शहरातील युवा कार्यकर्ते राजेंद्र आंभौर, संदीप मेहेत्रे, शिवानी येथील सरपंच तांबेकर, पत्रकार नंदू वाघमारे यांनी नुकतीच ८ किमी परिसरात फिरून या संपूर्ण जंगलाची माहिती घेतली. या संदर्भातील एक व्हिडिओ अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू असून वनपर्यटन या भागात किती महत्त्वाचे आहे या बाबत ही टीम सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेऊन हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनाही या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. व्हिडिओ अहवाल तयार झाल्यास पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना तो सुपूर्द करण्यात येणार आहे.
समृद्धी, स्मार्ट सिटी आणि वनपर्यटन
महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. १ मे रोजी नागपूर, शिर्डीपर्यंत हा महामार्ग सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. समृद्धी सिंदखेडराजा शहराच्या एक किमी जवळून गेला आहे तर सावरगाव माळ परिसरात समृद्धीची स्मार्ट सिटी वसवली जाणार आहे. यात कृषीवर आधारित उद्योग प्राधान्याने घेतले जाणार आहेत. वनपर्यटन प्रकल्प ज्या वनविभागाच्या जमिनीवर बसविण्याची मागणी होत आहे तो जंगलपट्टा समृद्धी आणि समृद्धी स्मार्ट सिटी पासून जवळ आहे. याच भागात स्मार्ट सिटीचा इंटरचेंज असल्याने या वनपर्यटन प्रकल्पात येण्या-जाण्यासाठी मोठी सुविधा होणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा राबता या प्रकल्पात नक्कीच पाहायला मिळेल.