ऑनलाईन खरेदी वाढली
बुलडाणा : गुढीपाडव्यानिमित्त होणारी खरेदी यंदा ऑनलाईन होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दुकाने बंद असल्याने अनेकांनी ऑनलाईन खरेदीला पसंती दिली आहे. सोने ऑनलाईन खरेदी करण्याची ग्राहकांची पसंती नाही. मात्र, इतर वस्तू ह्या ऑनलाईन बोलाविण्यात येत आहेत.
बुलडाणा तालुक्यात २१० रुग्ण
बुलडाणा : जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात कोरोनाबाधितांचा सर्वाधिक आकडा राहत आहे. दिवसाला २०० पेक्षा अधिक रुग्ण बुलडाणा तालुक्यात सापडत आहेत. रविवारी तालुक्यात २१० रुग्ण सापडले आहेत.
रक्तदान करण्याचे आवाहन
बुलडाणा : रक्तदान शिबिरे प्रामुख्याने कॉलेजेस, आयटी व अन्य उद्योग क्षेत्रामध्ये घेऊन रक्त जमा केले जात असते; परंतु आता बहुतांश कॉलेज बंद असल्याने व बऱ्याचशा सेवा क्षेत्राचे वर्क फ्रॉम होम पद्धतीनुसार काम सुरू असल्याने मोठी रक्तदान शिबिरे घेता येत नाहीत. नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
कर्णकर्कश हॉर्नने ध्वनिप्रदूषणाचा धोका
दुसरबीड: बाईकवेड्या तरुणांकडून विचित्र आवाज काढणाऱ्या हॉर्नचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होत आहे. मात्र, हॉर्नचे डेसिबल मोजण्याची मशीन वाहतूक पोलिसांकडे उपलब्ध नसल्याने कारवाईकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस वाटप रखडले
सुलतानपूर : लोणार तालुक्यात पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गॅसचे वितरण रखडले आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा परिणाम विविध शासकीय योजनांवर झाला आहे. त्यात उज्ज्वला गॅस योजनेलाही कोरोनाचा खोडा निर्माण झाला आहे.
पर्यावरण कर भरण्याकडे दुर्लक्ष
किनगाव राजा : परिवहन व परिवहनेतर (खासगी) संवर्गातील वाहनांना २०१० पासून पर्यावरण कर लागू करण्यात आलेला आहे. खासगी संवर्गातील वाहनांना १५ वर्षांनंतर वाहनाचा प्रकार व इंधनानुसार पर्यावरण कर भरणे अनिवार्य आहे; परंतु वाहनधारक पर्यावरण कर भरत नसल्याचे दिसून येते.
आश्रमशाळेत शिक्षकांना मुख्यालयाची ॲलर्जी
बुलडाणा : जिल्ह्यातील आश्रमशाळेत शिक्षक व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून शाळेच्या आवारात निवासस्थाने बांधून दिलेली आहेत. मात्र, ही निवासस्थाने ओस पडलेली आहेत.
वाहतुकीचा खोळंबा
बुलडाणा : शहरात वाहतुकीचा खोळंबा होण्याचे प्रमाण अधिक आहे. अलीकडच्या काही दिवसांत ही समस्या वाढत चालली असल्याने दररोज वाहतुकीचा खोळंबा होतो. दुकानांसमोर रस्त्यावर लावलेली वाहने, हातगाडे यामुळे वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक राहत नाही.
सुविधांचा अभाव, विद्यार्थ्यांचे नुकसान
देऊळगाव मही : हल्ली कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. मात्र, गावपातळीवरील विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या तयारीसाठी हव्या त्या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे गुणवत्ता असूनही मोठ्या शहरात जाऊन सराव करणे शक्य होत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत मागे पडतात.