येथील रफिक खाँ (४२) यांचे मोताळा आठवडी बाजार चौकात किराणा दुकान आहे. ते बुधवारी सायंकाळी दुकान बंद करून घरी गेले. गुरूवारी पहाटे ३ ते ३.३० दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या छतावरील टिनपत्र्याचा नटबोल्ट काढून दुकानात प्रवेश केला व दुकानातील झंडू बामचा एक बॉक्स, बिड्यांचे बॉक्स असा एकूण १ लाख १ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. किराणा व्यावसायिक रफिक खाँ यांनी गुरुवारी सकाळी दुकान उघडले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, दुकानाच्या पाठीमागील दुसऱ्या एका किराणा दुकाना बाहेरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, पहाटे सव्वा तीन वाजताच्या सुमारास एक चोरटा किराणा दुकानाकडून पोतडीमध्ये सामान चोरी करून नेताना दिसून आला. पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे.
मोताळा शहरासह परिसरात चोरीच्या घटना वाढल्या असून, अनेक चोऱ्यांचा अद्याप उलगडा झाला नाही. मागील महिन्यात या किराणा दुकानासमोरील मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी तब्बल पाच लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. त्यानंतर सुद्धा परिसरात बऱ्याच ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. मात्र चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांसह नागरिकांमधून होत आहे. याप्रकरणी रफिक खाँ यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली असून वृत्त लिहीपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.