नांदुरा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील आंबोडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ महिन्यापूर्वी गटविकास अधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे; परंतु याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. पाणी समस्या दूर करण्यासाठी गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा, असे पत्र स्थानिक ग्रामपंचायतच्यावतीने २0 फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकारी नांदुरा यांना देण्यात आले; मात्र प्रशासनाने अद्यापपर्यंंत या पत्रावर कुठलीही कार्यवाही न केल्याने गावकर्यांमध्ये प्रशासनाबाबत तीव्र रोष व्यक्त होत आहे. आंबोडा येथे ५ सार्वजनिक विहिरी तर १७ हातपंप आहेत. सार्वजनिक विहिरी तर गेल्या महिन्यातच कोरड्याठण्ण पडल्या होत्या; तसेच १७ हातपंपांपैकी ६ हातपंप कोरडे आहेत. उर्वरित ११ हातपंपांना अत्यल्प पाणी असल्याने फेब्रुवारीपासूनच या गावाला पाणीटंचाईचे चटके बसण्यास सुरूवात झाल्याने महिन्याभरापूर्वी स्थानिक ग्रामपंचायत सचिव व उपसरपंच यांनी ही बाब गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदुरा यांच्या निदर्शनास आणून गावाला टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती; तसेच गावातील रघुनाथ बावस्कर यांची आमसरी शिवारातील विहीर अधिग्रहण करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला. गेल्या महिन्यापर्यंंत ११ हातपंपांना थोडेफार पाणी यायचे, आज मात्र हे हातपंपही पाणी नसल्याने बंद पडले आहेत. पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा गावकर्यांनी तक्रारीद्वारे दिला आहे.
आंबोड्यात भीषण पाणीटंचाई!
By admin | Published: March 18, 2015 11:52 PM