लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : काँग्रेसला अभिप्रेत असणारी ही ‘जीएसटी’ नसून, केंद्र शासनाने लादलेल्या जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यापारी वर्गाला अधोगतीकडे घेऊन जाणारी ही कर प्रणाली असेल, असे प्रतिपादन खा. अशोकराव चव्हाण प्रदेश अध्यक्ष म.प्र.कॉ.क. अध्यक्ष यांनी केले.१२ जुलै रोजी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित फसवी कर्जमाफी एल्गार आंदोलनाचे निमित्ताने खा. चव्हाण बुलडाणा येथे आले होते. त्याप्रसंगी बुलडाणा अर्बन रेसिडेन्सीमध्ये आयोजित व्यापारी आयोजकांचे चर्चासत्रात त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी ना. माणिकराव ठाकरे, उपसभापती विधान परिषद, आ. राहुल बोंद्रे, अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, आ. हर्षवर्धन सपकाळ, सचिव अ.भा.काँ.क. दिलीप सानंदा, अॅड. गणेशराव पाटील, श्याम उमाळकर, विजय खडसे, म.प्र.काँ.क. विजय बाफणा, चेंबर्स आॅफ कॉमर्स अध्यक्ष, अनिल नावंदर, दीनदयाल वाधवाणी आदींची उपस्थिती होती. जिल्हाभरातून आलेल्या किराणा, कपडा, बांधकाम, मेडिकल, सोने-चांदी, सिनेमागृह, धान्य, पतसंस्था, हार्डवेअर, रेडिमेड आदी होलसेल व्यापाऱ्यांशी संवाद साधताना व त्यांच्या अडीअडचणी समजावून घेताना खा. अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले, की या अन्यायकारक कर प्रणालीमुळे आपला देश हा सर्वाधिक जास्त कर आकारणी करणारा देश म्हणून जगभरात पुढे येतो आहे. ही बाब देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक ठरणारी असून, केंद्र शासन जी.एस.टी. प्रणाली लाभदायक कर प्रणाली असल्याचे सांगत असताना, देशातील लाखोंच्या संख्येने असलेला व्यापारी वर्ग संघटित होऊन या कर प्रणालीला विरोध का करीत आहे, धरणे का देत आहे, हे न समजण्यासारखे आहे. याबाबत काँग्रेस पक्ष अर्थव्यवस्थेला बाधा न येऊ देता कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता सदैव व्यापारी वर्गाच्या पाठीशी असून, याबाबत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे देशभरात मार्गदर्शन लाभणार आहे. या पार्श्वभूमीवर २२ जुलै रोजी पुण्यात पी.चिदंबरम यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. चर्चासत्राचे प्रास्ताविक श्याम उमाळकर यांनी केले.याप्रसंगी चर्चासत्रात कृषी विक्रेते हाजी नईम खॉं, धनंजय देशपांडे, अमरचंद कोठारी, भूषण देशमुख, राजेश देशलहरा, प्रदीप छाजेड, अजय दर्डा, गौतम बेगाणी, सुरेश मुंधडा, कांतीलाल छाजेड, संजय कोलते, दीपक छाजेड, विजय कुळकर्णी, दिलीप व्यवहारे, अरुण भुतडा, डॉ. अजय ढगे, के.के. पंजाबी, नितीन सावजी, जितेंद्र दर्डा, कैलास भडेच, विजय अडसूळ, कैलास केनकर, किशोर गणोरकर आदींनी सहभाग घेतला. आभार आ. राहुल बोंद्रे यांनी मानले. चर्चासत्राचे संचालन सतीश मेहेंद्रे, सरचिटणीस जि.कॉं.क. यांनी केले. यशस्वितेसाठी सतीश मेहेंद्रे, गौतम बेगानी, महेंद्र बोर्डे, अॅड. शरद राखोंडे, सुरेश सरकटे, सुनील तायडे यांनी परिश्रम घेतले.
व्यापाऱ्यांना अधोगतीकडे नेणारी ‘जीएसटी’!
By admin | Published: July 15, 2017 12:14 AM