चिखली : चिखली उपजिल्हा रुग्णालयातील मान्यताप्राप्त समर्पित कोरोना हेल्थ सेंटरसाठी ऑक्सिजन प्लांटला मान्यता देण्याची घोषणा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ७ जून रोजी चिखली येथील एका कार्यक्रमात केली. पालकमंत्र्यांच्या या घोषणेमुळे आ. श्वेता महाले यांनी चालविलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
चिखली येथे लक्ष्मीनारायण ट्रस्टच्या वतीने ना नफा ना तोटा या तत्त्वावर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेसह वैद्यकीय सहायता उपकरण केंद्राचा शुभारंभ डॉ. शिंगणे यांच्या हस्ते ७ जून रोजी पार पडला. यावेळी डॉ. शिंगणे यांनी जिल्ह्यातील इतर समर्पित कोविड हेल्थ सेंटरप्रमाणेच चिखली येथेही ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने संबंधितांना प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देशित केले असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील सर्व समर्पित कोविड हेल्थ सेंटरला ऑक्सिजन प्लांट मंजूर झालेले आहेत; परंतु चिखली येथे आ. श्वेता महाले यांच्या प्रयत्नांतून ग्रामीण रुग्णालयातील मंजूर समर्पित कोविड हेल्थ सेंटरला ऑक्सिजन प्लांट नसल्याने येथेही ऑक्सिजन प्लांट मंजूर करावा, अशी मागणी आ. महाले यांनी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्याकडे केली होती. चिखली येथेही देऊळगाव राजा व खामगाव येथील प्लांटप्रमाणे दररोज सुमारे १ टन ऑक्सिजन उत्पादन क्षमता असलेले, ऑटोमॅटिक इंपोर्टेड व २ कॉम्प्रेसर असलेल्या प्लांटला जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मान्यता देऊन तातडीने प्लांट कार्यान्वित करण्याची मागणी महाले यांनी लावून धरली होती. डॉ. शिंगणे यांनी कार्यक्रमात बोलताना ऑक्सिजन प्लांट मान्यतेची घोषणा करून दिलासा दिला आहे. सोबतच आ. महाले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला देखील यश आले आहे.