बियाणे बाजारातून खरेदी करावायचे असेल तर बियाणे खरेदी करताना पक्के बिल घेऊनच खरेदी करण्यात यावे याबाबत शेतकऱ्यांना अवगत करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या मेहकर मंडळात ५६ गावे असून, या गावांमध्ये या अगोदरच मृदा आरोग्यपत्रिका प्रत्येक गावांमध्ये लावण्यात आलेल्या आहेत. त्यानुसारच सोयाबीन पिकास ग्रेडनिहाय कोणती खते देणे आवश्यक आहे व खताची मात्रा किती लागणार आहे, याबाबतचे फ्लेक्स तयार करून प्रत्येक गावामध्ये, तसेच कृषी केंद्रामध्ये लावण्यात आले आहेत. बोर्डवर सोयाबीन पिकास बाजारात उपलब्ध असलेल्या खताच्या ग्रेडनुसार सात पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हे फ्लेक्स बोर्ड प्रत्येक गावांमध्ये सभा घेऊन शेतकऱ्यांना वाचन करून दाखविण्यात आले आहे. शुक्रवारी जयताळा येथे सभा घेऊन कृषी सहायक भूषण लहाने यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली आहे.
खताचा वापर कसा करावा
रासायनिक खताचा वापर कमी करून गरजेनुसार व जमीन सुपीकता निर्देशांकानुसारच खताचा वापर करावा, शक्यतो सेंद्रिय खते जसे की शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत यासारख्या खताचा वापर करावा, शक्य असेल त्यांनी हिरवळीच्या खताचा वापर करावा व अनावश्यक युरिया खताचा वापर टाळावा, याबाबत कृषी विभागाकडून माहिती देण्यात आली.
चालू वर्षी कृषी विभागामार्फत खताची दहा टक्के बचत करण्याची मोहीम हाती घेतलेली असून, दहा टक्के खताची बचत करण्यासाठी बियाण्यास रायझोबियम व पी.एस.बी. यासारख्या कल्चरची बीज प्रक्रिया करूनच सरी-वरंबा किंवा पट्टा पद्धतीने सोयाबीन पिकाची पेरणी करावी. जेणेकरून पिकास दिलेल्या खताचा कार्यक्षमतेने वापर होईल व खताची मात्रा कमी लागेल. सोबतच अनावश्यक खताचा वापर टाळावा.
सुधाकर कंकाळ, मंडळ कृषी अधिकारी, मेहकर.