लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर तथा इंटरनॅशनल को-आॅप.अलायन्स आशिया पॅसिपिक युथ कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांनी सेंट्रल एशिया क्षेत्रातील विविध देशांचा दौरा करून तेथील सहकारी संस्थांना भेटी दिल्या, तसेच जागतिक पातळीवर पतसंस्था बळकट करण्याकरिता काय करणे गरजेचे आहे, याबाबत मार्गदर्शन केले. जागतिक स्तरावरील सहकार क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण व मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या इंटरनॅशनल को-आॅप.अलायन्स आशिया पॅसिपिक युथ कमिटीच्या युथ विंगचे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून डॉ.झंवर कार्य करीत आहेत. दरम्यान,आशिया पॅसिपिक रिजन अंतर्गत व या कार्यक्षेत्रात जवळपास २९ देशांचा समावेश असून, डॉ.झंवर अध्यक्ष म्हणून आशिया क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. पहिले भारतीय म्हणून डॉ.झंवर यांना हा मान मिळाला आहे. सेंट्रल आशिया अंतर्गत तजाकीस्तान, किरगीस्तान, कझाकीस्तान, उसबिगीस्तान, बेलारुम, वार्मेनिया आदी देशांचा समावेश आहे. सोव्हिएत रशियाचे जेव्हा विघटन झाले तेव्हा उपरोक्त देशांची निर्मिती झाली. साम्यवादापासून पुंजीवादापर्यंतचा या देशांचा प्रवास अत्यंत खडतर व बिकट असा राहिला आहे आणि त्यामुळेच या देशांमध्ये सहकार क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊ शकला नाही आणि सहकार क्षेत्रदेखील विस्तारित होऊ शकले नाही.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय किंबहूना जागतिक स्तरावर विचार केला तर आज सहकार क्षेत्र किती महत्त्वपूर्ण आहे, याची प्रचिती येते. सहकारातून विकास साधल्या जातो आणि समृद्धीदेखील येते, असा ठाम विश्वास असल्याने सहकार क्षेत्रात मागे असलेल्या या देशांमध्ये सहकार क्षेत्राचा प्रसार व्हावा, या देशांमध्ये सहकार रुजला जावा, सहकाराचे फायदे स्थानिक नागरिकांना मिळाले पाहिजेत, यासाठी आय.सी.ए.चे अध्यक्ष या नात्याने डॉ.झंवर यांनी सेंट्रल आशियातील देशांचा दौरा करून तेथील सहकारी संस्थांना भेटी दिल्या, यावेळी डॉ.झंवर यांनी त्या देशांचे कृषी मंत्री व अर्थमंत्री यांची भेट घेऊन चर्चा केली. या दौऱ्यात डॉ.झंवर यांनी रशियाच्या शिष्टमंडळाचीदेखील भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ.झंवर यांनी सहकार क्षेत्रातील विविध पैलु, संधी, विकास त्याचबरोबर जागतिक स्तरावरील सहकार क्षेत्रातील काही समस्या व त्यावरील उपाय आदी एकूणच सहकार क्षेत्रासंदर्भात सादरीकरण केले.यावेळी डॉ. झंवर यांनी बुलडाणा अर्बन संस्थेने सहकार क्षेत्रात केलेले कार्य, विविध सामाजिक उपक्रम व योजना, सोशल बँकिंग, ‘फोर पिलर सिस्टम’ आदीबाबत माहिती विषद केली. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात याठिकाणी आलेल्या विविध देशांच्या शिष्टमंडळाची डॉ.झंवर यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रतिनिधीसोबत सहकार क्षेत्राविषयी चर्चा केली.दरम्यान या दौऱ्याच्या निमित्ताने बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झंवर यांच्या कार्याची दखल थेट जागतिक स्तरावर घेण्यात आली. ही संस्थेच्या सभासदांसाठी तसेच संपूर्ण बुलडाणा अर्बन परिवाराच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहकार क्षेत्राचा अभ्यास, सहकार क्षेत्रातील समस्यांची जाण, या क्षेत्रातील अडचणी व त्यावर उपाय योजना करणे तसेच दूरदृष्टी व निश्चित व्हिजन, याबाबत डॉ. झंवर यांनी मार्गदर्शन केले.
आशियातील सहकारी संस्थांना झंवर यांचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:09 AM